रस्त्यावरील सर्व्हिसिंग सेंटर व्यवसायांवर सक्तीने कारवाई करा

-महापौर दयाशंकर तिवारी यांचे पोलीस वाहतूक विभागाला निर्देश 

नागपूर : नागपूर शहरातील चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक तसेच सेवासदन चौक ते गीतांजली चौक या रोडवर अनेक व्यावसायिक जुन्या वाहनांचा व्यवसाय करतात. हे व्यावसायिक विक्रीसाठी ठेवण्यात आलेले वाहन मनमानी पद्धतीने रस्त्यावर पार्क करतात. त्यामुळे येथील इतर वाहतुकदारांना त्रास सहन करावा लागत असून वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे अपघात सुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करून रस्त्यावर वाहनांचा, सर्व्हिसिंग सेंटरचा व्यवसाय करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी पोलीस वाहतूक विभागाला दिले.

          शहरातील वाहतूक समस्या, रस्त्यांवरील अतिक्रमण आदींबाबत महापौरांनी मनपा प्रशासन आणि पोलीस वाहतूक विभागासोबत बैठक घेतली. गुरुवारी (ता. १३) महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन येथे झालेल्या बैठकीत गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक ॲड.संजय बालपांडे, नगरसेवक राजेश घोडपागे, नगरसेविका सरला नायक, नगरसेविका विद्या कन्हेरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक आयुक्त अशोक पाटील, वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे, कोतवाली पोलीस निरीक्षक जयेश भांडाकर, तहसील पोलीस स्टेशनचे श्री.ठाकरे, वाहतूक पोलीस निरीक्षक उरला कोडावार आदी उपस्थित होते.

          गांधीबाग झोन अंतर्गत अनेक भागातील मुख्य मार्गांवर वाहन विक्रेते, वाहन दुरूस्ती करणारे, प्रवाशी वाहतूकदार, कापड दुकाने, शनिवार बाजार, इतर व्यवसाय अशा विविध व्यावसायींमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्यामुळे येथील मार्गांवर अपघाताच्या घटना घडतात. नागरिकांना होणा-या त्रासाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याबाबत गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक आणि ज्येष्ठ नगरसेवक ॲड.संजय बालपांडे यांनी यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांना विनंती केली.

          गांधीबाग झोन अंतर्गत सेवासदन चौक ते गीतांजली चौक आणि चिटणीस पार्क ते अग्रसेन चौक या मार्गावर वाहन दुरूस्ती आणि जुने वाहन विक्रीच्या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या दुकानांमध्ये येणारी वाहने, व्यावसायींची विक्रीची वाहने ही सर्व वाहने रस्त्यावरच उभी ठेवली जातात. त्यामुळे रस्त्यावरून होणा-या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. ही सर्व वाहने वाहतूक पोलीस प्रशासनाने टोईंग वाहनाद्वारे उचलण्यात यावीत. टोईंग वाहन विभागाकडे उपलब्ध नसल्यास ते उपलब्ध होईपर्यंत या वाहनांवर सक्तीने चालानची कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे ही कारवाई नियमित स्वरुपात सुरू ठेवण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिले.

वाहन विक्रीशिवाय इतर व्यवसायीकांद्वारेही रस्त्यांवर सामान ठेवले जाते. अशा सर्व व्यावसायीकांवरही सक्तीने कारवाई करून त्यांचे रस्त्यावर ठेवलेले सामान जप्त करण्यात यावे, असेही निर्देश महापौरांनी दिले. गांधीसागर तलावाजवळ रजवाडा पॅलेस ते गंजीपेठ चौक मार्गावर शनिवार बाजार भरविला जातो. या बाजारामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. याबाबत सुद्धा तातडीने दखल घेत बाजारातील दुकानदारांवर सामान जप्तीची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

          सेन्ट्रल ऐव्हेन्यूच्या मागच्या भागात अनेक नागरिकांनी पाय-या, रॅम्प आदीचे अनधिकृत बांधकाम रस्त्यावर करण्यात आले आहेत. याशिवाय गांधीबाग येथे रस्त्यावरच कपड्याचे मॉडेल उभे ठेवले जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीला अडथळा असतो. या भागातही कारवाईला गती देउन येथील सर्व अतिक्रमण काढण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

          शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या अतिक्रमणासंदर्भात मनपा प्रशासनाने विशेष मोहिम राबवावी. या मोहिमेमध्ये मनपाच्या सफाई कर्मचा-यांनाही सहभागी करून घेण्यात यावे, असेही निर्देशित केले.

          नंगा पुतळा चौकावरील मार्गावर पाणीपुरी, चाट, चायनीस फूड आदींच्या अनेक हातगाड्यांचे व्यवसाय चालतात. आधीच्याच वर्दळीच्या या भागात या हातगाड्यांमुळे रस्त्यावर गर्दी होते आणि वाहतूक प्रभावित होते. या हातगाडी व्यावसायीकांना मनपाद्वारे पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि त्यांची अधिकृत नोंदणी करून त्यांना व्यवसायासंदर्भात ठराविक क्रमांक मनपाद्वारे उपलब्ध करून देण्यात यावा. यातून व्यावसायिकांचे व्यवसाय प्रभावित होणार नाही शिवाय यातून मनपाला महसूलही प्राप्त होईल, असेही महापौरांनी सांगितले.

          इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) चौकापासून ते गीतांजली रोडवर खासगी बसेस उभ्या ठेवल्या जातात. तास न् तास ही वाहने रस्त्यावर उभी राहिल्याने सुद्धा वाहतूक प्रभावित होते. त्यामुळे या बसेसवर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

कोविड नियमांचा उल्लंघन : शोध पथकाची ५ लॉन वर कारवाई

Fri Jan 14 , 2022
नागपूर :   नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (१३ जानेवारी) रोजी १३ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून दोन लाख पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने मंगळवारी झोन अंतर्गत के आर सी लाँन , गोरेवाडा रोड, एन एल विला, अवस्थी चौक, एहबब कॉम्युनिटी हॉल, अनंत नगर यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ६५,००० च्या दंड वसूल केला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत आई साहेब सभागृह, रेशीमबाग येथे सुद्धा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!