संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- ग्राम पंचायत कांद्रीची लोकसंख्या झपा ट्याने वाढत असल्याने नागरिकांच्या विकासाकरिता ग्राम पंचायत कांद्रीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. परंतु कचरा डम्पिंग ही रहिवाशी ठिकाणी होत असल्याने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नागरिकांनी रोष व्यक्त केलेला आहे.
कांद्री नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी ओला कचरा आणि सुका कचराची विल्हेवाट करण्यासाठी गावाच्या शेजारी असलेला दुर्गा माता मंदिराच्या मागच्या बाजुला नगरपंचायत कर्मचारी कचरा टाकत आहे. कचरा मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, ज्वलनशिल पदार्थ आणि इतर वस्तु असतात. काही कर्मचारी साठवलेल्या कचरा जाळतात त्यामुळे परिसरात काळोख होत वातावरणात वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात होते.
नागरिकांचा मते परिसरात दम्याचे आणि हृदयाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढुन त्यांना श्वास घेताना त्रास होतो तसेच लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात वारा वाहत असल्याने सर्व कचरा लोकांच्या घराच्या आत मध्ये व परिसरामध्ये उडुन येतो. ज्यामुळे महिला वर्ग त्रासुन गेलेल्या आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे पाणी साठुन घाण होऊन सर्व परिसरात दुर्गंधी व मच्छर वाढुन आजारास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील कचरा डम्पिंग त्वरित बंद करून सुरक्षित ठिकाणी करण्यात यावी.
असे नगरपंचायत कांद्री मुख्याधिकारी याना परिसरातील नागरिकांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. शिष्टमंडळात शिवशंकर चकोले, धर्मेंद्र (बंटी) सरोदे, रत्नाकर मस्के, संदीप मेश्राम, आशिष डेंडुलकर, स्वप्नील वानखेडे, बबलु कैथवास, शुभम धांडे आदी सह बहु संख्येने महिला, पुरूष नागरिक उपस्थित होते.