नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे धंतोली झोन अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक ते मानेवाडा चौक (संभाजी चौक) मार्गाचे ‘क्रांतिकारी आजाद शाहू मार्ग’ असे नामकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी (ता. २६) प्रभाग क्रमांक ३३ व ३२ मधील मानेवाडा रोडवरील शाहू गार्डन हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आमदार प्रवीण दटके, मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, माजी आमदार सुधाकर कोहळे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत, हनुमान नगर झोनच्या सभापती कल्पना कुंभलकर, नगरसेविका भारती बुंडे, विशाखा बांते, रुपाली ठाकूर, नगरसेवक सर्वश्री मनोज गावंडे, अभय गोटेकर, अग्निशमन समिती सभापती दीपक चौधरी, माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, क्रांतिकारी आजाद शाहू स्मृती मंचचे अध्यक्ष उमेश शाहू, कार्याध्यक्ष राकेश शाहू, खादी आयोगाचे संचालक जयप्रकाश गुप्ता, माजी आमदार दीनानाथ पडोळे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम क्रांतिकारी आजाद शाहू यांना अभिवादन केले. ते म्हणाले, आजाद शाहू यांनी युवा अवस्थेत असतानाच हिंदुस्थानी लाल सेनेत काम सुरु केले. देशासाठी समर्पण भावनेने त्यांनी देशसेवा केली. त्यांचा सहवास मिळाला हे सौभाग्य असल्याचे प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले. आजाद शाहू यांचे व्यक्तिमत्व वर्तमान पिढीतील युवांसाठी प्रेरणादायी आहे. अशा महान व्यक्तींबद्दल युवा पिढीला माहिती सांगण्याची गरज आहे. कारण देशाचा इतिहास प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे तो विसरून चालणार नाही. मनपा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नागपूर शहरातील होऊन गेलेल्या स्वतंत्रता सेनानींची देण्यात यावी, अशा प्रकारचा उपक्रम मनपाने सुरु करावा, अशी सूचना यावेळी नितीन गडकरी यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना दिली.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा शाळांमध्ये केलेले बदल हे उल्लेखनीय आहेत. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात मनपा शाळेतील मुलांना चांगले संस्कार देण्यात आहे, अशा शब्दात नितीन गडकरींनी महापौरांचे कौतुक केले. तसेच प्रभाग क्र. ३३ व ३२ मधील नगरसेवकांचे अभिनंदन केले.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील स्वतंत्रता सेनानींचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा या उद्देशाने शहरातील शहीद सेनानींच्या घरासमोर मानपद्वारे त्यांच्या नावाचे नामफलक लावण्यात येत आहेत. या उपक्रमातून समाजातील युवांना नक्कीच प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले, शाहू समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे इतिहासाला लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. ज्या देशाच्या इतिहासाची माहिती समाजातील व्यक्तींना असते तो देश जिवंत असतो. मात्र ज्या देशाचा इतिहास माहिती नसेल तो देश कधीही इतिहास घडवू शकत नाही, असे महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले.
यावेळी आमदार मोहन मते आणि उमेश शाहू यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करून क्रांतिकारी आजाद शाहू यांना अभिवादन केले. कार्यक्रमांचे संचालन अश्विनी मोडक यांनी तर आभार धंतोली झोनच्या सभापती वंदना भगत यांनी मानले.