– दिलेल्या मुदतीतच सर्वेक्षण करा – निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुक्रे
नागपूर :- मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षणाला राज्यात दिनांक २३ जानेवारी पासून सुरुवात करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात येत असून सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील सुक्रे यांनी आज दिल्यात.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्वेक्षणासंदर्भात राज्यस्तरीय आढावा न्या. सुक्रे यांनी घेतला त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्यसचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त दूरदृष्यप्रणालीद्वारे तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, महानगरपालिका उपायुक्त निर्भय जैन आदी बैठकीस उपस्थित होते.
राज्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने विविध स्तरावर गोखले इन्स्टीट्युट तर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या कामाला प्राधान्य देवून दिलेल्या मुदतीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे अशा सूचना यावेळी निवृत्त न्या. सुनिल सुक्रे यांनी दिल्या.
मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या दृष्टीने जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावर उपाययोजना करतांना या सर्वेक्षणाला जनतेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.