– पर्यटनासाठी जातांना काळजी घ्या: मनपाचे जनहितार्थ आवाहन
नागपूर :- रिमझिम पावसाची सुरुवात होताच नागरिकांचे पाय आपसूक निसर्गाच्या दिशेने वळू लागतात. अशात शहरातील प्रसिद्ध अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलावावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ करण्यात आले आहे. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता मनपाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलावाभोवती बॅरिकेडिंग करण्याचे ठरवले असून, तीनही तलावांवर बोटींसह बचाव पथक आणि उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहे.
शहरातील प्रसिद्ध अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलावात पावसाळ्यात पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता बॅरिकेडिंग, सूचना फलक लावण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले होते,त्या अनुषंगाने तलावावर भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवन रक्षक आणि उपद्रव शोध पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. हे जवान पर्यटकांना तलावा नजीक पाण्याजवळ जाऊन जोखीम पत्करू नये असे प्रत्यक्ष आवाहन करीत पर्यटकांची समजूत काढत आहेत.
मनपा आयुक्तांनी शहरातील अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलावात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी बघता सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय तीनही तलावामध्ये अग्निशमन विभागामार्फत बोट व बचाव पथक तैनात करण्याचे आणि उपद्रव शोध पथकाच्या जवान तलावाकाठी हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यानुसार अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा येथे बचाव पथक आणि उपद्रव शोध पथकाचे जवान आपले कर्तव्य बजावत आहेत.
तलावात पर्यटनासाठी जातांना सावधगिरी बाळगावी, तलावाच्या नजीक जाण्याचे टाळावे आणि दुरून पर्यावरणाचा आनंद घ्यावा. आपली स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करावी. असे आवाहन मनपा आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.