– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
– पदव्युत्तर जनसंवाद विभागात परिचय कार्यक्रम
नागपूर :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागात परिचय कार्यक्रम बुधवार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून कुलगुरू डॉ. चौधरी बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, नागपूर आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी (प्रोग्राम हेड) रचना पोपटकर (गजभिये), विभाग प्रमुख डॉ. मोईज मन्नान हक यांची उपस्थिती होती.
स्वतःचा परिचय करून देत कुलगुरू डॉ. चौधरी यांनी भाषणाची सुरुवात करीत जनसंवाद विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोणतेही क्षेत्र मर्यादित नाही. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण हे आंतरविद्या शाखीय झाले आहे. सर्व विषयांचे ज्ञान असेल तर संबंधित विषयामध्ये कौशल्य प्राप्त असेल तरच तो व्यक्ती जगात तग धरू शकतो. आता तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीने सर्वच गोष्टी एका डिवाइस मध्ये आल्या आहे. त्यामुळे विविध कौशल्य असलेल्या व्यक्तीस कोणत्याही कंपनीमध्ये चांगली संधी मिळते त्यामुळे सर्व गोष्टी शिकायला पाहिजे, असे कुलगुरू म्हणाले. एनईपी २०२० मध्ये वर्गातील शिक्षण २५ टक्क्यावर आणले असून ७५ टक्के शिक्षण हे प्रात्यक्षिकावर आधारित आहे. त्यामुळे शिक्षक हे आता केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे. मुलांना स्वतः शिकत क्रेडिट प्राप्त करावे लागणार आहे. कशा प्रकारची रचना तयार व्हावी म्हणून कुलगुरू म्हणून आल्यानंतर सर्वप्रथम सर्व विभागांना स्वायत्तता प्रदान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे उदाहरण देत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी पत्रकारिता क्षेत्रातील विविध संधी व आव्हानांबाबत माहिती दिली. जनसंवाद हे असे क्षेत्रातील विद्यार्थी बेरोजगार असल्याचे आढळून येत नाही. गुणवत्तेनुसार या क्षेत्रात संधी मिळते. लेखक, बातमीदार, आकलन वैशिष्ट्य, वक्तृत्व, तंत्रज्ञानाची माहिती आदी तुमच्यामधील कला तुम्हाला पुढे घेऊन जाते. देशाच्या मध्यभागी असलेले नागपूर या ठिकाणी माध्यमांमध्ये काम केलेल्या व्यक्तींचे फार मोठे वलय आहे. सोबतच पत्रकारिता हा आवडीचा विषय असेल तर या क्षेत्रात तुमचे भविष्य उज्वल असल्याचे टाके पुढे बोलताना म्हणाले.
प्रमुख अतिथी नागपूर आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी रचना पोपटकर यांनी आकाशवाणीच्या कार्याबाबत माहिती दिली. आकाशवाणी हे एक प्रसिद्ध जनसंवादाचे माध्यम असून मनोरंजन आणि माहिती याचा समन्वय साधून कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. आकाशवाणीमध्ये अभियांत्रिकी, कार्यक्रम, बातमी विभाग असे विविध विभाग आहेत. बदलत्या तंत्रज्ञानात आकाशवाणी देखील डिजिटल माध्यमात आली आहे. या क्षेत्रामध्ये रेडिओ जॉकी, डबिंग आर्टिस्ट, स्क्रिप्ट रायटर, कंटेंट रायटर, ब्राॅडकास्ट प्रोड्यूसर आदी विविध संधी असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण घेत असताना ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करा, असे ही त्या म्हणाल्या. विभाग प्रमुख डॉ. मोईज मन्नान हक यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविक करताना सांगितली. विभागातील विद्यार्थ्यांकडून कॅम्पस पत्रिका काढली जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते कॅम्पस पत्रिका तसेच आजादी का अमृत महोत्सव बुकलेटचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमात नव्याने प्रवेशित विद्यार्थी यांचा परिचय घेण्यात आला तर माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अश्विनी चौधरी तर आभार जान्हवी भगत या विद्यार्थिनीने मानले.