पावसामुळे क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरूस्ती प्राधान्याने करा – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

– कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे

– रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर

– अहेरीत ब्लडबँकेच्या इमारतीकरिता १ कोटी ७० लाख निधी मंजूर

गडचिरोली :- जिल्ह्यात पावसामुळे रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ते दुरूस्त करावे. तसेच रस्ते बांधकामाची मंजूरी असतांनाही ज्या कंत्राटदारांनी विहित मुदतीत कामे पूर्ण केली नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करून अक्षम्य दिरंगाई करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज दिले.

अहेरी मतदार संघातील विकास कामांचा आढावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. जिल्हाधिकारी संजय दैने, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, अहेरी उपविभागीय अधिकारी आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा नियोजन अधिकारी श्री पाचकवडे यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात नुकतेच मोठ्या प्रमाणात झालेल्या पाऊस व पूरामुळे रस्ते व पूल क्षतीग्रस्त झाले आहेत, त्यांची तातडीने दुरूस्ती करावी. आलापल्ली, लगाम, मार्कंडा, खमनपूर, आष्टी, भामरागड, सिरोंचा, रेपणपल्ली या मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होवू शकतो, त्यामुळे तातडीने या मार्गांवरील खड्डे बुजविण्यात यावे. लगान ते आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला वनविभागाचीही परवानगी मिळाली आहे, त्यामुळे कोणतीही कारणे न देता येथील रस्ते बांधकामाची कामांना सुरवात करावी. अपूर्ण रस्ते बांधकामांमुळे जिल्ह्याची नाहक बदनामी होत असून याबाबतीत कोणताही निष्काळजीपणे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्री आत्राम यांनी दिला.

अहेरी येथे ब्लडबँकेच्या इमारतीकरिता १ कोटी ७० लाख निधी मंजूर करण्यात आला असल्याने इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून ब्लडबँक सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

रस्ते, आरोग्य व शिक्षण या त्रिसुत्रीच्या विकासावर अधिक भर देण्याचे सांगतांना पेसा क्षेत्रातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करणे, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दर्जेदार भोजन देण्याचे व शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वत: दुर्गम भागात भेट देवून याची तपासणी करण्याचे, प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची भरती करणे, पाणीपुरवठा योजनेच्या बंद पडलेल्या सोलर प्रणाली प्राधाण्याने दुरूस्त करणे, सिरोंचा येथील खताचा 1200 मे.टन बफर साठा शेतकऱ्यांसाठी खुला करणे, पाऊस व पूरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करणे आदी सूचना मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी संजय दैने यांनी रस्ते बांधकामाची कामे करतांना तांत्रीक बाबी तपासून गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा पूरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री साखरवाडे, श्री रामटेके, तसेच विद्युत विभाग, पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, अहेरी विधानसभा मतदान क्षेत्रातील तालुकास्तरीय अधिकारी, तसेच भाग्यश्री आत्राम, रविंद्र वासेकर, लीलाधर भरडकर आदि उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल राधाकृष्णन - पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

Sat Aug 3 , 2024
नवी दिल्ली :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. 2) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!