नागपुर – रक्तातील लालपेक्षींमध्ये होणाऱ्या सिकलसेल आजारातील ग्रस्तांना रक्तसंक्रमणाची आवश्यकता अत्याधिक भासत असते. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर व अनुवांशिक असलेल्या सिकलसेल आजाराला जगभरातील अनेक रूग्णांना याचा सामना करावा लागत आहे. सिकलसेल आजाराच्या निदानाबाबत हवी तशी जनजागृती होत नाही. प्रत्येक नागरिकांनी जर जनजागृतीचा विडा हाती घेऊन जनजागृतीसह रक्तदानाचे महादान करणे आवश्यक असून यातून होणाऱ्या सामूहिक संघर्षातूनच सिकलसेल आजारावर मुक्ती मिळविता येणार, असा विश्वास अर्चना उंबर्गी यांनी व्यक्त केले. सिकलसेल ग्रस्तांसाठी स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) रक्तपेढी व स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्गदर्शनात आयोजित 50 दात्यांनी रक्तदानाचे महादान केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव निरगुसना ठमके, ट्रस्टचे सल्लागार यशवंत बागडे, राजेंद्र उंबर्गी आणि नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑर्गनाजेशनचे (नास्को) सचिव गौतम डोंगरे यांची उपस्थिती होती. जयवंत नगर येथील इंद्रप्रस्थ हाऊसिंग सोसायटी, प्राचार्य अरूणराव कलोडे महाविद्यालयाजवळील तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मुख्यालयातील पहिल्या माळयावर आयोजित रक्तदान शिबिराची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून करण्यात आले.
पुढे बोलतांना अर्चना उंबर्गी म्हणाल्या की, सिकलसेलचा रुग्ण म्हटले की नातेवाईकांना सर्वप्रथम रक्ताची जमवाजमव करावी लागते. यात त्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागते. हा प्रकार कुणासोबतही होवू नये या हेतूने रक्तदान शिबिरे जागोजागी घेण्याची गरज आहे. ट्रस्टद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात 50 जणांनी रक्तदान केल्याबद्दल उंबर्गी यांनी त्यांचे कौतुक केले. ‘सिकलसेल ग्रस्तांना एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत ग्रस्तांना समुपदेशन तसेच मुबलक दरात औषधांबाबत जनजागृती अभियानाचे उद्घाटनही यावेळी अर्चना उंबर्गी यांच्या हस्ते करण्यात आले.
स्मृतीशेष मधुकराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट, नॅशनल अलायन्स ऑफ सिकलसेल ऑर्गनाजेशन (नास्को), इंडियन अंम्बेडकराईट डाॅक्टर फेडरेशन (आयएडीएफ), अम्बेंडकर ऍनलाईस्ट, पँथर पाव मिशन टी ट्वेन्टी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे संचालन ट्रस्टचे व्यवस्थापक अमोल कांबळे तर आभार पँथर पावचे अॅड. निलेष खोब्रागडे यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नागेश पटाळे, पद्मा डोंगरे, अतुल कुमार खोब्रागडे, रोहिणी भालेवार तसेच एचसीएल फाऊंडेशन आणि मधुकरराव तामगाडगे प्रेरणा प्रबोधिनी वाचनालयाच्या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले, अशी माहिती तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.