– “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांचे वितरण
– ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन
मुंबई :- महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या विधानपरिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांतील सन २०१९ ते २०२४ या कालावधीतील ‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारप्राप्त सदस्यांना मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या या विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. यावेळी ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील राज्य विधानमंडळांमध्ये स्थापन झालेली (सन १९५२) सर्वात पहिली शाखा आहे. संसदीय लोकशाहीच्या संदर्भात सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रम राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सातत्याने राबविण्यात येतात. सन १९९५ पासून दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना प्रत्येक वर्षासाठी “उत्कृष्ट संसदपटू” आणि “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून पुरस्कारप्राप्त सदस्यांना दि.३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या समारंभात गौरविण्यात येईल.
या समारंभास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या गौरवशाली परंपरेतील या संस्मरणीय आणि ऐतिहासिक सोहळ्यासाठी दोन्ही सभागृहांचे विद्यमान सदस्य, विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य यांना निमंत्रित करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही पीठासीन अधिकारी यांनी केले.