नागपूर :- विधान परिषदेच्या नाशिक मतदार संघात कॉंग्रेस पक्षात जे काही घडलं, त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली होती. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पार्लीयामेंटरी बोर्डाचे सदस्य डॉ. आशिष र. देशमुख (माजी आमदार, नागपूर) यांनीसुद्धा ही मागणी केली होती. महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटविण्याचा निर्णय तर झालाच नाही मात्र कॉंग्रेसच्या अंतर्गत वादासंदर्भात अवलोकन करण्यासाठी आणि अहवाल पाठविण्यासाठी रमेश चेन्निथाला यांची एक-सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय झालेला आहे. के. सी. वेणुगोपाल यांनी त्यासंबंधी एक पत्र काढले आहे. त्यावर डॉ. आशिष र. देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली-
“महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटविण्यात यावे, अशी कॉंग्रेसचे विधिमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मागणी केली. त्यासाठी त्यांनी आपला विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देखील दिलेला आहे. तो ते वापस घेणार नाहीत. मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण जाणतो. माझे असे मत आहे की, ही जी रमेश चेन्निथाला यांची एक-सदस्यीय समिती बनविली आहे, ही संपूर्णत: फार्स आहे. के.सी. वेणुगोपाल हे नाना पाटोलेंच्या खिशात आहेत. नाना पाटोलेंचे धागेदोरे हे संपूर्ण हायकमांडच्या वर्तुळात आहेत, त्यामुळे नाना पाटोलेंना नक्कीच बदलण्यात येणार नाही. त्यासाठीच या कमेटीचा फार्स नेमण्यात आलेला आहे. १७ जानेवारीला मी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटून महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सद्य बिकट परिस्थिती सांगितली आणि तेव्हा तशा आशयाचे पत्र देखील त्यांना दिले. आमच्यासारख्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा वार्तालाप हा खर्गे यांच्याशी मराठीतच होत असल्यामुळे ते पत्र मी मराठीत लिहिले होते. पण त्यांनी मला ते पत्र इंग्रजीमध्ये द्यायला सांगितले. आपल्याला मराठी चांगले समजते, तेव्हा इंग्रजीमध्ये का..? असे मी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, अशा प्रकारची पत्रे मला वेणुगोपाल यांना रेफर करावी लागतात. आणि म्हणूनच हे जे निर्णय आजच्या घटकेला कॉंग्रेसमध्ये राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर होत आहेत, ते के.सी. वेणुगोपालांसारख्या अपरिपक्व नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहेत. ऑर्गनायझिंग सेक्रेटरी हे अतिशय जबाबदारीचे पद आहे. आपण पाहिले की, अशोक गहलोत यांच्यासारखे, जे आज राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासारख्या प्रगल्भ आणि प्रदीर्घ अनुभव असलेल्या लोकांनी या पदावर आपलं कार्य सिद्ध करून दाखवलं आहे. आज जी परिस्थिती देशात आहे, ती के.सी. वेणुगोपाल यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून होत आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ नेते भांडत आहेत. राजस्थानमधील परिस्थिती सर्वांना माहित आहे. छत्तीसगडमध्ये देखील मुख्यमंत्री बघेल आणि सिंग यांच्यामध्ये भांडणं आहेत. हीच परिस्थिती आपण सातत्याने पंजाबमध्येसुद्धा पाहिली आहे आणि बाकीच्या राज्यांमध्ये पाहिली आहे. अंतर्गत कलह होत असेल आणि त्यासाठी कोणाला कारणीभूत ठरवायचे असेल तर ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कारणीभूत आहेत. आपण ज्या काळातून जात आहोत त्यात तीन-तीन राज्यांमध्ये जसे, त्रिपुरा, नागालॅड, मेघालय मध्ये निवडणुका होत आहेत, तिथे कॉंग्रेसची काय परिस्थिती आहे? येणाऱ्या डिसेंबरपर्यंत मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगाना यासारखी जी राज्ये आहेत ती देखील निवडणुकीला सामोरे जात आहेत, पण कुठेही सुसूत्रता बघायला मिळत नाही. या सर्व परिस्थितीवर खर्गे सारखे वरिष्ठ नेते काहीच करू शकत नाहीत, ही मुळात माझ्यासारख्या व्यक्तीला टिपणी करावीशी वाटते. २७-२८ फेब्रुवारीला कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ‘प्लेनरी सेशन’ रायपूरला होणार आहे. स्वाभाविकरित्या आजपर्यंत कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या निवडणुका होत आल्या आहेत. कॉंग्रेस वर्किंग कमिटीमध्ये कोण लोकं जाणार हे संविधानानुसार त्या निवडणुकीतून ठरतं. पण माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या निवडणुका रायपूरच्या प्लेनरी सेशनमध्ये होणार नाहीत. सर्वस्वी नेमणूक करून काहीतरी केल्याचा कॉंग्रेसचा फार्स पुन्हा एकदा यानिमित्याने राहणार आहे.
जे काँग्रेसचे दिल्लीतील सूत्र आहेत, तिथले प्रगल्भ अनुभव असणारे जे नेते आहेत, त्यांच्या निरिक्षणातून हेच दिसतं की नाना पटोलेंना बदलविण्यात येणार नाही. के.सी. वेणुगोपाल हे नाना पटोलेंच्या सोबत आहेत आणि म्हणूनच एक-सदस्यीय समिती रमेश चेन्निथाला यांची नेमणूक केली आहे. आणि त्यातून नाना पटोले यांची उचल बांगडी होईल, असे मला तरी वाटत नाही. ह्याच पद्धतीनं जर सगळं चालत राहीलं तर नक्कीच बाळासाहेब थोरात सारख्या लोकांना देखील काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल असं माझं मत आहे.
जेव्हा रमेश चेन्निथाला महाराष्ट्रात येतील तेव्हा आमच्यासारखे सर्व नेते, कार्यकर्ते त्यांना भेटून अजून एकदा पटवून देण्याचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू. पण जर या सर्व संदर्भामध्ये उच्चस्थ नेतृत्व हे काही करण्यासाठी तयार नसेल तर नक्कीच महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्षात काही ना काही घडामोडी घडू शकतात. मागेदेखील मी सांगितलं होतं की, राजीनामाच सत्र सुरू होईल आणि दुसऱ्याच दिवशी आपण पाहिलं की बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या वरीष्ठ नेत्याने विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये नक्कीच सर्वकाही ठीक नाही आणि त्यासाठी खर्गे सारख्या नेतृत्वालादेखील कुठेतरी आपल्या पद्धतीने काम करण्यासाठी मनाई होत आहे, ही देखील वास्तविकता आहे.
सर्व जण रायपुरच्या प्लेनरी सेशनसाठी नक्कीच थांबले आहेत. त्यामध्ये निवडणुका होतात किंवा होत नाहीत किंवा परत आपल्याच मर्जीतल्या लोकांना काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये टाकण्यात येतं किंवा जे वारंवार वर्षानुवर्षे ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी व बाकीच्या पदांवर आरूढ आहेत त्याच लोकांना परत ठेवण्यात येईल, हे स्पष्ट होईल. शेवटी ज्यांचे गल्लीत काही नाही आहे, ते दिल्लीत जाऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळेल. मग त्यामध्येच आमच्या नागपूरचे मुकुल वासनिक असतील किंवा अविनाश पांडे असतील. चाळीस वर्षांपासून ते लोकं काँग्रेसचे सूत्र दिल्लीत सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या असण्यामुळे काँग्रेसमध्ये काहीतरी सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटत नाही. म्हणुनच हे जर वारंवार होत असेल तर या संदर्भात देशातल्या सगळ्या काँग्रेसजनांनी विचार करण्याची आणि निर्णायक भूमिका घेण्याची गरज आहे.
काल जे के.सी. वेणुगोपाल यांचे पत्र आले त्यावर माझे प्रांजळ असे मत आहे की, त्यांच्यासारखा अपरिपक्व व्यक्ती या संपूर्ण देशातली काँग्रेस हाताळतो आहे आणि नक्कीच त्यांच्याकडून काही सकारात्मक निर्णय पुढच्या काळात येतील अशी शक्यता दिसत नाही. ज्याप्रमाणे मागच्या सात-आठ वर्षांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसची पिछेहाट झाली तशी आता सुद्धा होईल, असं मला वाटते. पाहिलं मागील चार वर्षांमध्ये नाना पटोले हे जेव्हापासून भाजप सोडून काँग्रेस मध्ये आले त्यांना आठ आठ पद त्यांना के.सी. वेणुगोपाल यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदापासून तर प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत अशी ही मोठी पदे त्यांना देण्यात आली. आणि महविकास आघाडीचं सरकार जर शाबूत राहिलं असतं तर वेणुगोपाल यांनी नक्कीच त्यांना मंत्री देखील बनवलं असतं. म्हणून येवढ्या मोठ्या प्रमाणात के.सी. वेणुगोपालकडून नाना पटोलेंचे लाड होत असताना या एक-सदस्यीय समितीचा कुठलाही फायदा होणार नाही. म्हणूनच ही समिती एक ढोंग आहे व त्यातून नाना पटोले यांची उचल बांगडी होईल, असे मला वाटत नाही.”