नागपूर :- आयुष्याच्या सायंकाळी काही क्षण निवांत घालविण्याच्या उद्देशातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र गरजेची आहेत. ज्येष्ठ नागरिकांना करमणुकीसाठी विविध साहित्य उपलब्ध करुन देत नगरपरिषद स्तरावर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समितीवर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघातील दोन नवीन नियुक्त झालेल्या सदस्यांची निवड, ज्येष्ठ नागरिक कक्षातील संयोजक, उपसंयोजक, सहसंयोजक, सदस्य नियुक्ती आदी विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
कुटुंबाची व पोटच्या मुलाबाळांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी करणाऱ्या आई-वडिलांना वृध्दापकाळात घरातीलच सदस्यांकडून अपमानजक वागणूक दिली जाते. आयुष्याचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा, अशी सर्वांची मनोमन इच्छा राहते. परंतु काही संवेदना हरपलेल्या पाल्यांकडून वयोवृध्द माता-पित्यांकडे दुर्लक्ष केले जाते. अशावेळी त्यांना उर्वरित आयुष्यातील काही क्षण निवांत घालवता यावेत, यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती महत्वपूर्ण ठरणार आहे.