– मोबाईलवरच मिळणार लसीकरणाची तारीख, केंद्रांची माहिती
नागपूर :- आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत शहरातील सर्व नियमित लसीकरणाच्या नोंदी डिजिटल होणार आहेत. केंद्र शासनाद्वारे याकरिता ‘यू-विन’ पोर्टल सुरू करण्यात आले असून या पोर्टलवरच आता शहरातील गर्भवती माता आणि बालकांच्या नियमित लसीकरणाची नोंद केली जाईल. विशेष म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून लसीकरण झाल्यानंतर मोबाईलवर प्रमाणपत्र देखील डाउनलोड करता येईल तसेच लसीकरणाची पुढील तारीख आणि लसीकरण केंद्रांची माहिती देखील मिळणार आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘यू-विन’ वर लवकरच नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.
‘यू-विन’ (U-WIN) पोर्टल संदर्भात नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये मनपाद्वारे डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सहभाग नोंदविला व प्रशिक्षण पूर्ण केले. यासोबतच महानगरपालिका आणि शासकीय आरोग्य संस्था, वैद्यकीय अधिकारी व लसटोचक यांचे देखील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. नियमित लसीकरण करणारे खासगी वैद्यकीय आरोग्य संस्था यांना सुध्दा टप्याटप्याने प्रशिक्षणामध्ये सहभागी करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात होणा-या प्रत्येक लसीकरणाच्या नोंदी या डिजिटल स्वरुपात लाभार्थीस प्राप्त होतील.
‘यू-विन’ पोर्टलवरून लसीकरणाची संपूर्ण माहिती प्राप्त होणार आहे. आपल्या जवळ असलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती, आपल्या पुढील लसीकरणाचे वेळापत्रक या माहितीसह लाभार्थींना लसीकरणासाठी आगाउ नोंदणी देखील करता येणार आहे. नोंदणी केल्याची प्रत देखील या पोर्टलवरून प्राप्त करता येईल. ‘यू-विन’ पोर्टलमुळे नियमित लसीकरणाची प्रक्रिया अत्यंत सोपी जलद आणि खात्रीशिर होणार आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाअंतर्गत माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. सरला लाड ह्या यासंदर्भातील प्रक्रियेचा आढावा घेऊन ही सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करतील, असेही वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले.
पोर्टलमुळे माता आणि बालकांच्या लसीकरणाच्या तारखेचे संदेश मोबाईल मिळतील. त्यामुळे नियमित लसीकरण वेळेवर पूर्ण करण्याची प्रक्रिया सुलभ होईल. ‘यू-विन’ पोर्टलमध्ये स्वयं नोंदणीची (सेल्फ रजिस्ट्रेशन) देखील सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच आजपर्यंत झालेल्या लसीकरणाचा देखील अहवाल अपडेट करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये बालकांच्या लसीकरणा संदर्भातील माहिती, पालकांचे ओळखपत्र आणि नियमित वापरातील मोबाईल क्रमांक आदींसह संपर्क साधावा, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी केले आहे.