– माम देशमुख स्मृतीसभेतील मनोगत
नागपूर :- माम देशमुख यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आजीवन प्रबोधनाची चळवळ राबवली. त्यांनी बहुजन समाजाला खरा इतिहास सांगितला. आम्ही वेगवेगळ्या संघटनात वेगवेगळ्या विचारांचे जरी असलो तरी बहुजन समाजाच्या हितासाठी युती सरकार सारखे एकत्र आलो पाहिजे. असे झाले तरच ती खऱ्या अर्थाने माम देशमुख यांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारचे मनोगत मराठा सेवा संघाचे संस्थापक एड पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.
ते धनवटे कॉलेजच्या देशमुख सभागृहात आयोजित केलेल्या सामूहिक आदरांजली सभेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. सतत 3 तास चाललेल्या या आदरांजली सभा प्रसंगी विविध संस्था, संघटना व पक्षांच्या कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांचे स्मारक उभारल्या जावे, त्यांचा गौरव ग्रंथ काढण्यात यावा, त्यांच्या नावाने व्याख्यानमाला सुरू करण्यात याव्या, त्यांनी दिलेल्या इतिहासाच्या सूत्रानुसार बहुजन समाजाचे प्रबोधन केल्या जावे, त्यांनी बघितलेले शासक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या.
याप्रसंगी आ ह साळुंखे यांनी पाठवलेली व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आली. त्यानंतर मुस्लिम परिषदेचे प्रा जावेद पाशा, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक, ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, बहुजन संघर्ष चे नागेश चौधरी, देशोन्नतीचे प्रकाश पोहरे, बसपाचे उत्तम शेवडे, रविदास सत्यशोधक चे डॉ पी एस चंगोले, मराठा सेवा संघाचे मधुकरराव मेहकरे, कृषीतज्ञ डॉ ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रा मयूरा देशमुख, माम देशमुख यांची कन्या प्रा समता देशमुख, धनवटे चे प्राचार्य प्रशांत कोठे, प्रा रमेश पिसे, रमेश पाटील, विदर्भ आंदोलन समितीचे वी रा राजपूत, शिवाजी शिक्षण संस्थेचे हेमंत काळमेघ, संजय शेंडे, आर बी ठाकरे, विवेक कडू, सुरेंद्र बोराडे, प्रा समता देशमुख, आनंद ढोबळे आदींनी आपली आदरांजली व्यक्त केली.
जिजाऊ वंदना
प्रा मा म देशमुख यांनी शिवधर्म स्वीकारला होता. त्यानुसार त्यांचा अंतिम संस्कार जिजाऊ वंदनेने करण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्याचे व अग्नी देण्याचे काम त्यांची मुलगी प्रा समता देशमुख यांनी केले. आदरांजली स्थळी त्यांचा अस्तिकलश ठेवण्यात आला होता हे विशेष.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा राजू गोस्वामी यांनी केले. कार्यक्रमाला विदर्भातून व शहरातील मोठ्या संख्येने गणमान्य उपस्थित होते.