“ प्रेरणा 2023” पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीराचे थाटात उद्घाटन
नागपूर : देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जे नेतृत्व लागते ते तयार करण्याची जबाबदारी राष्टीय सेवा योजनेमार्फत करण्यात येते. या योजनेच्या स्वयंसेवकांचे राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यासाठी स्वयंसेवकात आत्मविश्वास निर्माण करुन नेतृत्व गुणांचा विकास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करतांना केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या वतीने नागपूर विद्यापीठातील सभागृहात पाच दिवसीय राज्यस्तरीय नेतृत्व गुणविकास शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले.
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दूधे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सोपानदेव पिसे, राज्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्राँड ॲम्बेसिडर नेहा पाठक तर दूरदृष्यप्राणालीद्वारे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी रामेश्वर कोठावळे यावेळी उपस्थित होते.
नेतृत्व गुणविकास या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. सुभाष चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी काय करावे, याबाबत संपूर्ण माहिती राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतच आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. महात्मा गांधीच्या विचारानूसार ग्रामोद्योगावर भर देवून गाम विकास करा हा संदेश ग्रामीण भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी देवून त्याचा प्रसार व प्रचार करण्याची नितांन गरज आहे. मुल्य कमी करण्यासाठी गावातच वस्तु तयार झाल्यास त्याचा फायदा देशास होईल. त्यामुळे देशाचे दरडोई उत्पन्न वाढून देशाच्या प्रगतीस हातभार लागेल. नागपूर विद्यापीठाद्वारे ग्राम अभियान सुरु करण्यात आले असून त्याद्वारे वनाकडे, गावाकडे वळा, गावाचा सर्वांगिण विकास करा, हा विचार समाजापर्यंत स्वयंसेवकांद्वारे पोहचविला जाणार आहे. या स्वयंसेवकाची नोंद त्यांच्या गुणपत्रिकेत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरामुळे स्वच्छता, व्यक्तीमत्व विकास, नेतृत्व विकास, व्यवहारीक शिक्षण, जी-20 चे नेतृत्व, जगाचे नेतृत्व, आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक बांधीलकीची शिकवण स्वयंसेवकांना मिळणार असल्याचे रामेश्वर कोठावळे यांनी सांगितले. वसुधैव कुटुंबकम शाश्वत विकासासाठी तारक आहे. सेंद्रीय शेतीकडे वळा, ग्राम विकास व पर्यावरण शुध्दीकरणावर भर देण्यासाठी स्वयंसेवकांनी कार्य करावे असे आवाहन प्र-कुलगुरु संजय दुधे यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोद खेडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रकाश शुक्ला यांनी मानले. या कार्यक्रमास राज्यातील विविध महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.