-आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र शासनाने दिली मान्यता
नागपूर :-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल साकारले जाणार आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा असणारे आंतर क्रीडा संकुल होणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्व प्रथम विद्यापीठ ठरणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याकरिता महाराष्ट्र सरकारने ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार रुपये इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रूपाने नागपूर शहराला जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल मिळणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जागतिक स्तरावरील आव्हाने आणि संधी यांची सांगड घालीत आवश्यकतेनुसार धोरणे आखली आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठाने जागतिक दर्जाचे आंतर क्रीडा संकुल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग वाढावा तसेच शाळा व इतर संस्था, व्यक्ती यांना देखील संकुलाचा लाभ व्हावा या दृष्टीने क्रीडा संकुलाचे बांधकाम प्रस्थापित केले आहे. यामध्ये बास्केटबॉल, बॅडमिंटन यासाठी सभागृह, शूटिंग आर्चरी, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, कबड्डी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकुलाच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची विनंती केली होती. या कामाची तांत्रिक पडताळणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची किंमत निश्चित केली. त्यानंतर उच्चस्तरीय समितीने याकरिता ४४ कोटी ४१ लाख ३८ हजार इतक्या किंमतीच्या अंदाजपत्रकास चक्रीय पद्धतीने मान्यता दिली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली. विद्यापीठाचा परिसर ३७३ एकर मध्ये पसरलेला आहे. मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या विद्यापीठाने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने विद्यापीठाच्या अंगीकृत ज्ञाननिर्मिती आणि कौशल्य निर्मिती बरोबरच विद्यापीठ परिक्षेत्रातील जनसमुहाच्या भौतिक गरजा आणि भविष्यातील विकासाच्या शक्यतांचा वेध घेऊन या आंतर क्रीडा संकुल आदी नवीन प्रकल्पांची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.
आंतरक्रीडा संकुलात अशा असतील सुविधा
आंतर क्रीडा संकुलामध्ये इनडोअर बास्केटबॉल, इनडोअर हँडबॉल, जिम्नॅस्टिक एरिना, रेसलिंग एरिना, फेन्सिंग एरिना, ज्युडो, कराटे, इनडोअर कबड्डी, खो-खो, क्वॅश आदी विविध खेळांच्या सुविधा राहणार आहे. या सोबतच ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर, रेन, रूप वॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर आणि स्पेशलाईज इक्विपमेंट, फायर फायटिंग अरेंजमेंट, कंपाउंड वॉल इंटरनल रोड, डेव्हलपमेंट ऑफ ग्राउंड, पार्किंग, लँडस्केपिंग अँड गार्डनिंग, लिफ्ट, एअर कंडिशनिंग, ट्रान्सफॉर्मर, सीसीटीव्ही आधी विविध सुविधा या आंतर क्रीडा संकुलामध्ये राहणार आहे.
खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा मिळणार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जागतिक दर्जाचे आंतरक्रीडा संकुल उभारणीलि महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल होणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे महाराष्ट्रातील प्रथमच विद्यापीठ ठरणार आहे. खेळाडूंना जागतिक दर्जाचे सुविधा युक्त क्रीडा संकुल उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करीत आहे.
डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर.