अमरावती – राणा दाम्पत्य भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल असून एकाच वेळेस भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन होड्यांमध्ये ते स्वार आहेत. खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी जोडपे खेळत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी केला आहे. एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार नवनीत राणा यांनी तोडलेले तारे अदभूत असून आगामी ऑलम्पिकमध्ये कोलांटउडी हा खेळ ठेवल्यास नवनीत राणा यांना गोल्डमेडल मिळेल याची शंभर टक्के खात्री असल्याचा टोलाही ॲड. दिलीप एडतकर यांनी लगावला आहे.
राणा दाम्पत्याने भाजपची नोकरी स्वीकारली असून सध्या ते रोजंदारीवर आहेत. मुंबईत अटक झाल्यानंतर भाजपने आपल्याला हवी तशी साथ दिली नाही , नोकरीत कायमही केले नाही म्हणून नाराज असलेल्या जोडप्याने दिल्लीत हनुमान चालीसा पठणाचा “शो” केला खरा; परंतु अद्याप त्यांच्या आकांनी त्यांची दखल घेतलेली नाही. म्हणून आता प्रसिद्धीमाध्यमांना या दाम्पत्याने हाताशी धरले आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला मुलाखत देताना आपण भाजप तर्फे लढणार का ? या अनेकवेळा विचारलेल्या प्रश्नाला नवनीत राणा यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळून मी अपक्ष खासदार आहेचा घोषा लावला होता. राष्ट्रवादीच्या कोट्यातून काँग्रेसच्या बळावर त्या निवडून आल्याचे स्पष्ट असताना स्वतःच्या अपक्ष विजयाचा टेंभा त्यांनी मिरवणे निषेधार्ह असून केवळ आणि केवळ जातीचे प्रमाणपत्र वैध ठरावे. किमान तारखांवर तारखा पडून २०२४ उजाडावे म्हणून भाजपाशी त्यांची लगट असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर यांनी केला आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्याबाबत नरमाईचे धोरण का स्वीकारता, या प्रश्नावर नवनीत राणा यांनी शरद पवार ८२ वर्षाचे असताना कोवीडच्या काळातही ते राज्यभर फिरले परंतु तरुण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र घरी बसून होते, अशी मखलाशी केल्यामुळे नवनीत राणा आणि राष्ट्रवादीची ही जवळीक आगामी लोकसभा निवडणुकीत परत एकदा राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आहे की भाजप – राष्ट्रवादीच्या मैत्रीतील छुपा दुवा आहे ? याचा खुलासाही संबंधितांनी करण्याची गरज असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
ये परत ये नवनीतताई मातृभूमीला
शेतकर्यांचा प्राण तळमळला
महाराष्ट्राची दुर्दशा होत आहे म्हणून दिल्लीत हनुमान चालीसा पठण करणाऱ्या नवनीत राणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी या क्षणापर्यंत तरी साधी भेटही दिलेली नाही. तरी लोचटाप्रमाणे दिल्लीतच ठाण मांडून बसलेल्या राणा दाम्पत्याने आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बियाण्याचा, खतांचा भेडसावणारा प्रश्न मतदारसंघात हनुमान चालीसा पठण करून सोडवावा, असे आवाहन दिलीप एडतकर यांनी केले आहे. दरवर्षी नांगरलेल्या शेतात पुन्हा नांगर टाकून जी छायाचित्र आपण प्रकाशित करता. त्या छायाचित्रांची वाट मतदारसंघातील जनता चातकाप्रमाणे पहात असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे