रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे आज उद्घाटन

– शहनाज अख्तर, उदित नारायण, सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’

– ‘रामायण’ महानाट्यासह स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम

– तीन दिवस चालणार महोत्सव

नागपूर :- प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रामटेक येथे 22 ते 24 जानेवारी दरम्यान होत असलेल्या तीन दिवस पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, 22 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता रामटेक येथील नेहरू मैदानावर होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त, नियोजन, कृषी, मदत, पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा व विधान परिषद सदस्य यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, पर्यटन विभागाचे उपसंचालक प्रशांत सवाई, रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, अभिनेता पुनीत इस्सार उपस्थित होते.

पहिला दिवस होणार ‘राममय’

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. उद्घाटन समारंभापूर्वी 5.30 वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता भव्यदिव्य ‘रामायण’ हे महानाट्य सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते पुनीत इस्सार आणि सिद्धांत इस्सार लिखित दिग्दर्शित व निर्मित या संगीतमय महानाट्यात भगवान श्रीरामाची भूमिका सिद्धांत इस्सार करणार आहेत. मा सीतेची भूमिका शिल्पा रायझादा, रावणाची भूमिका पुनीत इस्सार, हनुमानाची भूमिका विंद दारा सिंग करतील. इतर भूमिकांमध्ये अन्य 25 कलाकार आहेत.

दोन ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट

गुरुवार 23 जानेवारी रोजी ‘पापा कहते है’ फेम गायक उदित नारायण यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आली असून शुक्रवार 24 रोजी ‘छय्या छय्या’ फेम सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ रामटेकच्या नागरिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

*स्थानिक कलाकारांचा सहभाग*

या तीन दिवसीय महोत्सवात मुख्य कार्यक्रमांव्यतिरिक्त स्थानिकांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, सायकल स्पर्धा, मातीकला स्पर्धा, नौका स्पर्धा, स्केटिंग अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, फूड फेस्टिव्हल, हॉट एअर बलून आणि महिला बचत गटाचे स्टॉल प्रदर्शनही राहणार आहे.

या अभूतपूर्व महोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक डॉ. बी.एन. पाटील आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हिरणवार हत्याकांडातील मास्टरमाईंड शेखू खानच्या खापरखेडा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Wed Jan 22 , 2025
– हिरणवार हत्याकांडातील आरोपीची संख्या नऊ – हिरणवार हत्याकांडात आरोपी वाढण्याची शक्यता खापरखेडा :- स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीतील बाबूळखेडा शिवारात घडलेल्या बहुचर्चित पवन हिरणवार गोळीबार हत्याकांडातील मास्टरमाईंड गुलनवाज उर्फ शेखू इजाज खान व अजहर शेख रफिक शेख हे मागील तीन आठवड्या पासून फरार होते शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हेशाखा पोलिस खापरखेडा पोलीस त्यांच्या मागावर होते मात्र सतत लोकेशन बदलत असल्याने थांगपत्ता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!