– केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे यांनी वाहिली आदरांजली
नवी दिल्ली :- सामाजिक समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांची जयंती कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनाच्या दर्शनी भागात उत्साहात आज साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनच्या दर्शनी भागात राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनच्या सभागृहात शाहू महाराजांच्या प्रतिमेस निवासी आयुक्त रुपिंदर सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात सर्वश्री खासदार छत्रपती शाहू महाराज, सुनील तटकरे, श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, वर्षा गायकवाड, हेमंत सावरा, रविंद्र वायकर, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव, प्रशांत पडोळे यांसह इतर मान्यवरांनीही सहभाग घेतला आणि शाहू महाराजांना अभिवादन केले.
यावेळी सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपावार , महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
राजर्षि शाहू महाराजांच्या विचारांमुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक सुधारणा झाल्या, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले. त्यांच्या सामाजिक समतेच्या कार्याचा उल्लेख करून, राजर्षि शाहू महाराजांच्या योगदानामुळे भारतीय समाजात परिवर्तन घडविण्यात मोठी मदत झाल्याचेही त्यांनी नमूद केले.