नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीद्वारे राज बगदाई चॅम्पियन ठरला. पुरूष एकेरीत राज बगदाईने सचिन पाटीलचा 6-1, 6-2 असा दोन सेटमध्ये पराभव केला.
पुरूष दुहेरीत अनुभवी अजय नेवारे आणि युवा खेळाडू तेजल पाल या जोडीने रंजन चारमोडे आणि रोहन खुणे यांना मात देत विजेतेपद पटकावले. 16 वर्षाखालील वयोगटात अक्षत दक्षिणदार याने अहान शोरी ला 6-3 ने नमवून जेतेपदावर नाव कोरले. 12 वर्षाखालील वयोगटात प्रणव गायकवाड याने मानवेंद्र त्रिवेदी ला 6-3 ने मात दिली. 10 वर्षाखालील वयोगटात अगस्त्य सिंघानियाने अरमान तनेजा ला 6-5 ने नमविले.
16 वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये अग्रमानांकीत सेजल भूतडाने द्वितीय मानांकीत नयना तोतरेचा 7-1 ने पराभव करून बाजी मारली. मुलींच्या 14 वर्षाखालील वयोगटात मिष्का तायडेने उर्वी अत्रेला 7-2 ने मात दिली. 12 वर्षाखालील वयोगटात शर्वरी श्रीरामे हिने सुरमयी साठेचा 7-5 अशा फरकाने पराभव केला. 10 वर्षाखालील वयोगटात अनिषा शोरी ने राही साल्पेकर ला 6-0 ने नमविले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरु असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेचा शुक्रवारी 13 जानेवारी रोजी समारोप झाला. MSLTA टेनिस अकादमी, रामनगरच्या कोर्टवर चार दिवस 10, 12, 14, 16 वर्षाखालील वयोगटातील मुले आणि मुली, पुरुष खुल्या एकेरी आणि दुहेरी अशा दहा प्रकारांमध्ये चार दिवस सामने घेण्यात आले. स्पर्धेत हिंगणघाट, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि गोंदिया असे विदर्भातील विविध भागातील खेळाडू सहभागी झाले होते.
बक्षीस वितरण समारंभात खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ पियुष अंबुलकर, प्रगती पाटील, विनोद कान्हेरे, सतीश वाडे, अशोक भिवापूरकर, विक्रम नायडू आणि गणेश पागे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ.दर्शन दक्षिणदास यांनी संचालन केले, तर विजय नायडू यांनी आभार मानले. स्पर्धेचे पर्यवेक्षण विशाल लांडगे आणि त्यांच्या चमूने केले.