पोकलॅंड मशीनही हस्तगत…
महसूल विभागाची कारवाई सुरूच राहणार –
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते
रामटेक / पारशिवनी – सन २०२१-२२ साठी प्रस्तावित करण्यात आलेल्या कन्हान नदीवरील पारडी या नवीन घाटातून रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याचे कळताच महसूल विभागाच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. १७) दुपारी १ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात रेतीचा उपसा करण्यासाठी वापरली जाणारी पोकलॅण्ड मशीन आणि ५०० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी दिली.
पारशिवनी तालुक्यातील कन्हान आणि पेंच नदीवरील घाटांचे लिलाव झाले नसताना काही घाटांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याची माहिती रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी साहोली अ, साहोली ब, पारडी व इतर घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कुणीही नव्हते. शिवाय, त्यांच्या या दौ-याबाबत गोपनीयता पाळली होती.त्यांना पारडी घाटात एका पोकलॅण्ड मशीनद्वारे टिप्परमध्ये रेती भरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच पारशिवनीचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना घटनास्थळी बोलावले आणि धाड टाकली. मशीनचा चालक लाला मोहम्मद रहीम (रा. वलनी, ता. सावनेर) याच्याकडे रेती उपसा करण्याची रॉयल्टी नसल्याचे स्पष्ट होताच महसूल विभागाच्या या पथकाने पंचनामा करून ती पोकलॅण्ड मशीन आणि ५०० ब्रास रेती जप्त केली.उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केलेल्या
या कारवाईमध्ये रेती तस्करांवर थोडा वचक निर्माण झाला आहे. मात्र, पारडीसोबतच कन्हान व पेंच नदीच्या अन्य घाटांमधून रोज रेतीचा शेकडो ब्रास अवैध उपसा केला जात असून, ती चोरून नेली जाते. त्यामुळे महसूल विभाग अन्य घाटांवर धाडी टाकून कारवाई करणार काय, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे……..
पारशिवनी तालुक्यातील पेंच नदीवर पारडी हा नवीन रेतीघाट तयार करण्याचे महसूल विभागाचे प्रस्तावित केले आहे. या घाटाच्या परिसरातचे सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा सन २०२१-२२ या वर्षासाठी रितसर लिलाव करण्यात येणार आहे. या नवीन घाटामध्ये पारशिवनी तालुक्यातील पिपळा ते वाघोडा आणि सावनेर तालुक्यातील इटगाव ते दहेगावच्या परिसराचा समावेश असल्याची माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.