वर्ल्ड कप फूटबॉल पाहण्यास येण्याचे राज्यपालांना निमंत्रण
करोना काळात द्रवरूप ऑक्सिजन उपलब्ध केल्याबद्दल राज्यपालांनी मानले आभार
मुंबई – कतारचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी बुधवारी (दि. २२) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
सर्व जगाचे लक्ष लागून असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविण्यास कतार सिद्ध झाला असून राज्यपालांनी वर्ल्ड कप पाहण्यासाठी कतारला यावे असे निमंत्रण अल-सुलैती यांनी यावेळी राज्यपालांना दिले. भारतीय लोक कतारच्या विविध क्षेत्रांत मोठे योगदान देत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
कतारने दोहा येथे भारतीय दूतावासाला तसेच भारतीय राजदूतांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे नमूद करून भारताने देखील कतारच्या वाणिज्य दूतावासासाठी मुंबई येथे जमीन उपलब्ध करून द्यावी अशी विनंती अल सुलैती यांनी केली.
करोना संसर्गाच्या काळात कतारने भारताला वैद्यकीय द्रवीभूत ऑक्सिजन निःशुल्क उपलब्ध करून अनेक लोकांना जीवदान दिल्याबद्दल राज्यपालांनी वाणिज्यदुतांकडे आभार व्यक्त केले.
कतारने भारतात विविध क्षेत्रांत गुंतवणूक करावी व भारताच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. मुंबईत पाहिजे असलेल्या जमिनी संदर्भात दुतावासाने प्रस्ताव दिल्यास आपण त्याचा पाठपुरावा करू असे राज्यपालांनी वाणिज्यदूतांना सांगितले.