– विद्यापीठ आणि गिरिजन कनिष्ठ महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
अमरावती :- चिखलदरा येथील गिरिजन कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन विद्याथ्र्यांसाठी ‘भरड धान्य व किशोरवयीनांचे आरोग्य’ या विषयावर डॉ. मोतीलालजी राठी जनस्वाथ्य जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन व कार्यक्रमाच्या अध्यक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ.संयोगिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन चव्हाण उपस्थित होते.
प्रमुख अतिथी डॉ. मोहन चव्हाण यांनी विद्याथ्र्यांना भरड धान्याचे महत्त्व व आरोग्यविषयक फायदे सांगितले. वााणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अन्नशास्त्र विभागाच्या प्रा. निलिमा भोगे यांनी भरड धान्यविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी मेहिका वानखडे, ऐश्वर्या धांडे, अर्पिता सरोदे या विद्यार्थीनींनी भरड धान्यावर गीत सादर करुन गाण्याच्या माध्यमातून भरड धान्यावरील बाजरीचे महत्त्व सांगितले. तर कम्युनिकेशन अँड एक्स्टेंशनच्या विद्यार्थिनी अनुश्री आडे, क्षितीजा वानखडे, रुपाली वांगे, रेणुका वेरूळकर एम.एस्सी भाग 2 या विद्यार्थिनींनी ‘जंक फूड विरुद्ध हेल्दी फूड’ या विषयावर पपेट शो सादर केला.
पपेट शोच्या माध्यमातून त्यांनी विद्याथ्र्यांना जंक फूडचे आरोग्यावर होणारे वाईट परिणाम आणि पालेभाज्यांच्या पौष्टिक मूल्यांद्वारे पालेभाज्या आपल्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, याची माहिती दिली. त्याचबरोबर कु. सरस्वती भेंडेकर, स्वाती गायल या विद्यार्थीनींनी मोबाईल फोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम दोन पात्री नाटकाव्दारे पटवून दिले. तसेच विद्यार्थिनींनी भरड धान्यांचे महत्त्व या विषयावर पथनाट्यद्वारे भरड धान्यांच्या प्रकारांबाबत माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. संयोगिता देशमुख यांनी भरड धान्यांची गरज आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचे महत्त्व, भरड धान्यांचे विविध प्रकार, इतर भाषेतील भरड धान्यांची नावे, जगभरातील विविध भरड धान्यांची उत्पत्ती आणि त्यांचा इतिहास अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला. याप्रसंगी उपस्थित सहभागींना डॉ. संयोगिता देशमुख यांचे हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती व डॉ. मोतीलालजी राठी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भरड धान्यावर प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. दीक्षा हलवादिया या विद्यार्थीनीने उपस्थितांना भरड धान्यावर प्रतिज्ञा सादर केली. गृहविज्ञान विभागप्रमुख डॉ. वैशाली धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. अनुराधा देशमुख यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यशाळेचे व्यवस्थापन गृहविज्ञान विभागातील सुमेध वडूरकर यांनी केले. कार्यशाळेचे द्विमार्गी संप्रेषणाद्वारे मूल्यमापन करण्यात आले आणि ते अतिशय प्रभावी ठरले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. आभार अनुश्री आडे हिने मानले.