नागपूर :- सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलातर्फ़े ठिकठिकाणी दृकश्राव्य माधमातून जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
आषाठी एकादशीचे औचित्य साधून ही जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली असून नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांसोबतच, बाजार, संगणक आणि शिकवणी वर्ग, टीव्ही विक्रीची दुकाने, सार्वजनिक स्थळ, शॉपिंग मॉल्स, रुग्णालये, चित्रपटगृह आदी ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची माहिती देणारी चित्रफ़ित दिवसभार दाखविण्यात येत आहे, याचसोबत महावितरणच्या अभियंत्यांनी व कर्मचा-यांनी देखील उपस्थितांसोबत प्रत्यक्ष संवाद साधित या योजनेची माहीती दिल्या जात आहे.
वीजग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमध्ये सहभाग नोंदवून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंया दिलीप दोडके यांनी ग्राहकांच्या दारी जाऊन योजनेचा प्रचार करण्याची संकल्पना मांडली. त्यानुसार नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात या योजनेची जनजागृती सुरु करण्यात आली. राज्यात या योजनेला सर्वाधिक जास्त प्रतिसाद मिळत असलेल्या नागपूर परिमंडलातील तब्बल 3 हजार 627 ग्राहकांनी घरावर सौर रुफ़ टॉप बसवून वीज निर्मिती सुरु करण्यासोबतच मोफ़त वीज मिळविणे सुरु केले असून अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेत प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण पुरक वीज निर्मिती सोबतच मासिक वीज बिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली आहे. या योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात येत आहे.
सुलभ आणि जलद प्रक्रीया
या योजनेत सहबागी होऊ इच्छिणा-या वीज ग्राहकांना महावितरण मदत करते. सोबतच 10 किलोवॅटपर्यंत पीव्ही क्षमतेच्या रूफटॉप सोलर ऍप्लिकेशन साठी आवश्यक तांत्रिक व्यवहार्यतेसाठी स्वयंचलित मान्यता (डिम्ड अप्रूवल) दिली आहे. उपयोजित सोलर पीव्ही क्षमता रूफ टॉप सोलर ग्राहकाच्या मंजुर भारापेक्षा अधिक असेल, तर अशा ग्राहकांच्या भार वाढीसाठी लागू केलेल्या पीव्ही क्षमतेपर्यंत (जास्तीत जास्त 10 किलोवॅटपर्यंत) मंजूर भार वाढविण्यासाठीचा अर्ज स्वयंचलितपणे सिस्टमद्वारे तयार केला जाईल आणि त्यानुसार ग्राहकांना पैश्याचा भरणा करण्याचे सूचित केले जाईल. भार वाढीसाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर, वाढीव भार आपोआप लागू होईल. याशिवाय ग्राहक आणि सोलर रुफ़ टॉप बसविणा-या एजन्सीजसाथी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रीया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे.