– विबग्योर समूहाच्या शाळेचे उद्घाटन
नागपूर :- मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण द्या. त्यांना स्पर्धेच्या युगातील प्रत्येक नवी गोष्ट शिकवा. पण त्याचवेळी संस्कार आणि मूल्यांचेही शिक्षण द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांनी आज (रविवार) येथे केले.
पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वतीने उत्तर अंबाझरी मार्गावर आयोजित कार्यक्रमात ना. गडकरी बोलत होते. विबग्योर समूहाच्या शाळेचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी काळे फाऊंडेशन ट्रस्टचे विलास काळे, संस्थेच्या अध्यक्ष नीलिमा शुक्ल, उपाध्यक्ष नूतन कोलसकर, सीईओ किरणजित पन्नू आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गडकरी म्हणाले, ‘नागपुरात एक उत्तम शिक्षण संस्था सुरू होत आहे, याचा आनंद आहे. पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासोबत मूल्याधिष्ठित शिक्षणही काळाची गरज आहे. संस्कार देणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगला माणूस कसा घडवता येईल, याचा विचार करावा लागेल. कारण मूल्य आणि संस्कार हीच आपली जमेची बाजू आहे. हे सारे शिक्षणातून देणेच शक्य आहे.’ आज देशाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज आहे. देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहणार आहे. असे मनुष्यबळ चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणातून निर्माण होईल, असेही गडकरी म्हणाले.
नागपूर होतेय एज्युकेशन हब
नागपुरात आता एज्युकेशन हब म्हणून नावारुपाला येत आहे. अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था नागपुरात आल्या आहेत. पारडी येथे ११० एकरमध्ये सिम्बायोसिस आले आहे. त्याच्याच शेजारी ४९ एकरमध्ये नरसी मोनजी ही प्रतिष्ठित शिक्षण संस्था येत आहे. याशिवाय इंटरनॅशनल लॉ स्कूल, आयआयएम, ट्रिपल आयटी सुद्धा नागपुरात आहे, याचाही ना. गडकरींनी आवर्जून उल्लेख केला.