नागपूर :- नागपूर शहरातील नाग नदी काठावरील, भांडेवाडी कचरा डम्पिंग परिसर व रिंग रोड च्या खोलगट भागातील रहिवाशी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झाले आहेत. या ठिकाणच्या रहिवाशी नागरिकांचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले असून उपरोक्त भागातील रहिवाशी नागरिकांना सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सदर मागणीच्या निवेदनाची प्रत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना देखील पाठविलेली आहे.
नागपूर शहरातील प्रभाग क्रमांक २६ येथील नाग नदी काठावरील / रिंग रोड खालील / कचरा डम्पिंगमुळे प्रभावीत अशा सर्व वस्त्यांतील रहिवाशांना पावसाळ्यात मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मौजा वाठोडा परिसरातील पडोळे नगर, न्यू पँथर नगर, हिवरी नगर, शास्त्रीनगर झोपडपट्टी, घरसंसार सोसायटी देवीनगर, न्यू सुरज नगर, सुरज नगर, चांदमारी नगर, संघर्ष नगर झोपडपट्टी, धरती माँ नगर, पवनशक्ती नगर, विश्वशांती नगर, श्रावण नगर, राज नगर, अंतुजी नगर, अब्बुमीया नगर, तुलसी नगर, वैष्णोदेवी नगर, महेश नगर आदी वस्त्यांमधील नागरिकांचे शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असून अन्नधान्य आणि खाण्या-पिण्याच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. उपरोक्त अशा सर्व खोलगट भागात राहणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांचे शासनामार्फत सर्वेक्षण करून त्यांना तातडीने सानुग्रह मदत देण्याचे प्रशासनाला निर्देशित करावे, अशी मागणी देखील ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.