स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व्यवस्थापन हवे  -डॉ. माधवी खोडे-चवरे

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी अल्प आहे. या भूमीचे ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे. दिवसभराचे मिनिट टू मिनिट नियोजन करावे. वेळेचे सुरळीत व्यवस्थापन करुन अभ्यासक्रमातील बारकावे ओळखावे. अभ्यासक्रमातील संबंधित विषयांची माहिती घेऊन त्यानुसार सातत्यपूर्ण अभ्यास करुन आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी तरच यशप्राप्ती होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले.

            शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे सामाजिक न्याय भवनातील सभागृहात एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या. जिल्हाधिकारी आर. विमला, बार्टी पुण्याचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य तथा प्रादेशिक उपायुक्त सुरेंद्र पवार, प्रादेशिक उपायुक्त (समाजकल्याण) सिध्दार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून द युनिक ॲकडमी पुण्याचे तुकाराम जाधव, बीएस एज्युकेशन बॅकींग सोल्युशनचे अखिल कस्तुरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

            डॉ. खोडे म्हणाल्या की, वेळेचे अचूक नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे कठीण नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची संख्या कमी आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाव्दारे (बार्टी) मागासवर्गीयांना युपीएससी व एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, पुस्तके उपलब्ध करुन दिली जातात. मुलाखतीची तयारी करुन घेतली जाते. संस्थेच्या या स्तूत्य उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन परीक्षेत यश प्राप्त करुन आपले जीवन उज्वल करावे.

             विद्यार्थ्यांनी वेळेपेक्षा परिणामकारक व गुणवत्तापूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. मोबाईलचा कमी वापर करावा. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषणात्मक अध्ययन करावे. प्रश्नांची उत्तरे सोडवतांना परिचय, मर्म व निष्कर्ष या तिन्ही बाबी त्यात अंर्तभूत असाव्यात. प्रश्ने सोडविताना आकृती व फ्लो चार्टचा संबंध दाखवावा. नियमित अभ्यासासह व्यायामालाही प्राधान्य द्यावे, त्याने मेंदूची कार्यक्षमता वाढून शरीर कार्यान्वित राहते. याचा मुलाखतीसाठी खूप उपयोग होतो, असेही डॉ. माधवी खोडे यांनी यावेळी सांगितले.

            जिल्हाधिकारी आर विमला म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांनी कोणाचा व कुठला आदर्श धरावा, हे निश्चित करणे आवश्यक आहे. अनेक महापुरुषांनी शून्यापासून सुरुवात करुन यशाचे उंच शिखर गाठले आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा ही बाबपण लक्षात घेणे आवश्यक आहे. सातत्यपूर्ण जिद्दीने अभ्यास करुन स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करावे. बार्टी या संस्थेने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची चांगली सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारुन सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.     

            स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यामागचा मुख्य हेतू व बार्टीकडून देण्यात येणारे स्पर्धापूर्व प्रशिक्षण यासंदर्भात  गायकवाड यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा शिकवणीवर्गाचे अखिल कस्तुरकर व तुकाराम जाधव यांनी स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंचे विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पहारार्पण व दीप प्रज्वलनाने झाली. सूत्रसंचलन सतीश सोमकुंवर तर शितल गडलिंग यांनी आभार मानले. या कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

34 शौचालयों की सफाई पर लाखों खर्च

Fri Jul 1 , 2022
– प्रतिमाह लाखों का खर्च फिर भी दुर्गंध कायम नागपुर – शहर के बस्तियों में स्थित सार्वजनिक शौचालय धीरे धीरे समाप्त हो रहे हैं.नागपुर में फिलहाल 34 सार्वजनिक शौचालय होकर उस पर प्रतिमाह लाखों रुपए मनपा खर्च कर रही है फिर भी शौचालय में गंदगी का साम्राज्य देखने को मिलता है. कोरोना काल में सभी सार्वजनिक शौचालय शहर में बंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!