नागपूर :- महावितरणच्या उमरेड विभागांतर्गत भिवापूर येथील रहिवासी फ़किरा गायकी आणि मंडळ उपविभागांतर्गत परसोडी राजा येथील रहिवासी नरेश मेश्राम यांनी महावितरण कडे नविन घरगुती वीज जोडणीसाठी अर्ज केला आणि सर्व प्रक्रिया तत्परतेने पूर्ण करीत महावितरणने यांना अवघ्या 24 तासात नविन वीज जोडणी दिली. महावितरणच्या या तत्परतेने त्यांनी महावितरणचे आभार मानले आहेत. या माहिमेअंतर्गत नागपूर जिल्हयातील अनेक वीज ग्राहकांना त्वरीत वीज जोडणी देण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुक सेवा देण्याची सुचना केली आहे. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या नागपूर परिक्षेत्राच्या आढावा बैठकीत सर्व अधिकारी व अभियंता यांना ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा तत्परतेने देण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर परिमंडल अंतर्गत ग्राहकांना वीज जोडण्या तसेच ग्राहकांच्या विविध तक्रारींचे वेळेत निरासन करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी तात्काळ वीज जोडणी देण्यासाठी विशेष मोहीम सुरु करुन फ़किरा गायकी आणि नरेश मेश्राम यांच्यासारख्या ग्राहकांना तत्परतेने वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी या तत्परतेसाठी उमरेड उविभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लावार आणि त्यांच्या चमुचे अभिनंदन केले आहे.