‘सारथी’ च्या माध्यमातून तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना;‘सारथी’च्या उपक्रमांसाठी शासन सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक :- ‘सारथी’च्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून विभागातील मराठा व मराठा -कुणबी समाजातील तरूणांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून तरूणांचे भविष्य घडविण्याऱ्या ‘सारथी’ला शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

छत्रपती शाहू महाराज, संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था ‘सारथी’ पुणे या संस्थेच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र किशोर दराडे, दिलीप बनकर, ॲड. राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, छत्रपती संभाजीराजे भोसले, सारथीचे अध्यक्ष मधुकर कोकाटे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी.,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, उपव्यवस्थापकीय संचालक नितीन गावंडे तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचार, प्रेरणेतून सर्वसामान्य लोकांच्या मनातले कल्याणकारी कार्य शासन करत आहे. मराठा समाजातील तरूणाईला कौशल्य विकासाचे धडे देण्याबरोबरच त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि अर्थिक विकास होण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम सारथीच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. नाशिक येथे उभारण्यात आलेले ‘सारथीचे हे कार्यालय केवळ एक शासकीय वास्तू नसून ते अनेक तरूणांच्या भविष्याचे शिल्पकार असलेली प्रेरणा आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राजमुकुट हे सारथीचे बोधचिन्ह असून ते दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढायची प्रेरणा देणारे चिन्ह आहे.

नाशिक विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून सारथीला आपला दृष्टिकोन केवळ कागदावरच न ठेवता तो कृतीत आणण्याची संधी मिळाली आहे. विविध स्पर्धा परीक्षा, निरनिराळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, कौशल्य विकास, शिष्यवृत्ती यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तरुण व विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने सर्वांना लाभली आहे, त्यासाठी शासन सारथीला सर्व प्रकारचे सहाकार्य करणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

व्यापक जनहितासाठी काम करत असताना प्रसंगी कुठलेही धाडसी निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेण्याची तयारी असल्याचे सांगून मराठा समाजातील जे तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्तीपासून वंचित होते, त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्यात आली आहेत. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते शासन करत राहील, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा देताना गरजू लोकांना शासनामार्फत दिली जाणारी शिधाभेट साखर, रवा, तेल व चनाडाळ ही वेळेत सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या सूचनाही प्रशासनास दिल्या. सततच्या पावसाने शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीतून जातो आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपाचे परिणामकारक निर्णय घेतले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी एनडीआरएफ च्या निकषापेक्षा दुपटीची मदत शेतकरी बांधवांना देण्याबरोबरच निकषांत न बसणाऱ्या व सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटीही भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले.

सारथी च्या मध्यमातून तरूणांना दिशा – छत्रपती संभाजी राजे भोसले

सारथीच्या माध्यमातून मराठा, मराठा – कुणबी समाजाच्या तरुणांना दिशा मिळते आहे. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे सारथीमुळे विविध स्पर्धा परिक्षांमधून 50 विद्यार्थ्यांची आज देशाच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी पदांवर निवड झाली आहे. सारथीच्या जडण – घडणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान व पाठबळ असून त्यासाठी मुख्यमंत्री यांचे आभार मानतांना सारथीच्या योजना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी यावेळी केले.

सारथी चे अध्यक्ष मधुकर कोकाटे यांनी प्रास्ताविक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Fri Oct 21 , 2022
मुंबई :- राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती कंपनीद्वारे नवीन जलविद्युत प्रकल्प उभारणे, जुन्या जलविद्युत प्रकल्पाचा पुनर्विकास करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!