संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुमित पवार व परिषदेच्या शिष्टमंडळांनी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याशी १६जून २०२३ रोजी प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन दिले.
संचालकांना दिलेल्या निवेदनात११ वी-१२वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाची ओळख निर्माण करणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश करा, अन्यथा तीव्र लढा उभा करू,असा इशारा देण्यात आला.
वर्ष २०१९-२० साली लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकातून भारतीय संविधानाबाबतचा मोठा भाग वगळण्यात आला होता. यासंदर्भात गेल्या तीन वर्षांपासून राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेतर्फे राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मात्र, शासनाने याची कोणतीही दखल न घेतल्याने राज्यशास्त्र परिषदेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. याचे स्मरण प्रा सुमित पवार यांनी करून दिला. इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाबाबतच्या धड्यांचा पुन्हा समावेश करावा, अशी मागणी राज्यशास्त्र परिषदेकडून करण्यात आली आहे. तसेच याबाबत त्वरीत निर्णय न झाल्यास राज्यभरात तीव्र लढा करण्यात येईल, असा इशाही राज्यशास्त्र परिषदेकडून देण्यात आला आहे.
या भेटीदरम्यान प्रा. सुमित पवार यांनी बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांना निवेदन दिले. इयत्ता ११ वी १२ वी च्या पाठ्यपस्तकांमधून भारतीय संविधानाच्या अभ्यासक्रमाचा भाग वगळून टाकण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची ओळख होणार नाही. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात बदल करून त्यात भारतीय संविधानाचा समावेश करावी, अशी मागणी प्रा. सुमित पवार यांनी केली. तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील सर्वच शाखांमध्ये मराठी आणि इंग्रजी या विषयांप्रमाणेच राज्यशास्त्र या विषयाचादेखील समावेश करावा, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनानंतर बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनीही यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचीही माहितीही प्रा. सुमित पवार यांनी दिली. दरम्यान, यावेळी राज्यशास्त्र परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. संजय सुतार, उपाध्यक्ष सुरेश नारायणे, सह सचिव प्रा. डॉ. सुनिल राठोड व आशिष लोखंडे उपस्थित होते.