मुंबई :- पवना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील पवना, जाधववाडी आणि टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुनिल शेळके, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहता, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) स्वप्नील मोरे यासह इतर विभागांचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पवना प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याच्या कार्यवाहीला गती देताना प्रकल्पग्रस्तांना टाटा कंपनीनेही नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. टाटा कंपनीने भूसंपादन करतेवेळी केलेल्या सामंजस्य कराराबाबतही अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.