वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – डॉ. नितीन राऊत

 

वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी बैठक

नागपूर, दि. २८ : राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू. कृपया माझ्या विनंतीला मान देऊन प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.

त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्याला मान्यता दिली आहे. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी आपला संप मागे घेतील, असा विश्वास ऊर्जामंत्र्यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

दीड महिन्यांपूर्वी संपाची नोटीस देऊनही वीज व्यवस्थापन व प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्ही संपावर जाण्याचा निर्णय घेतला, अशी भूमिका वीज कर्मचारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी मांडली. वीज ग्राहकांना वेठीस धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, वीज कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणाला आमचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यावर डॉ. नितीन राऊत म्हणाले, वीज व्यवस्थापनाने दाखविलेल्या दिरंगाईबद्दल मी आपली क्षमा मागतो. सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो त्यामुळे चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

या संघटनांच्या प्रतिनिधींना उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठकीला येण्याचे आवाहन केले आहे. मी एक पाऊल पुढे टाकले आहे. तुम्ही त्याला प्रतिसाद देऊन एक पाऊल पुढे यावे, बैठकीला हजर रहावे आणि प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण केले जाणार नाही, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. संपावर जाऊन विरोधकांचा हेतू साध्य करू नका, असेही त्यांनी शेवटी आवाहन केले आहे.

ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या विनंती आणि आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्याच्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्याला मान्यता दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भव्य भूमिपूजन समारंभ संपन्न

Mon Mar 28 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 28 : –राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनीलबाबू केदार यांच्या सहकार्याने व जि प सदस्य प्रा. अवंतिका रमेश लेकुरवाळे यांच्या विशेष प्रयत्नातून NMRDA अंतर्गत ४ कोटी रु. चा निधीतुन मंजूर करण्यात आलेला बहादूरा-तरोडी-पांढुर्णा रस्त्याचे भूमिपूजन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले. तसेच खरबी ते जिजामाता नगर, तरोडी (खू) पर्यंतचा जो रस्ता अतिशय खराब आहे. त्याकरिता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com