– विकसित भारत संकल्प यात्रा : दहा हजारावर लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर :- विकसीत भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विविध भागातील लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधणार आहेत. शनिवारी ९ डिसेंबर २०२३ रोजी विकसीत भारत संकल्प यात्रेमध्ये पंतप्रधानांचा लाईव्ह संवाद कार्यक्रम असेल. नागपूर शहरात स्वावलंबीनगर येथील राम मंदिर परिसरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांचा एकाच छताखाली लाभ घेण्यासाठी नागरिकांनी कार्यक्रमाला भेट द्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
आदिवासी जननायक शहिद बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या अनुषंगांने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ केला. नागरिकांच्या हिताच्या कल्याणकारी योजना देशातील प्रत्येक भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविणारी ही यात्रा नागपूर शहरातही सुरू असून आतापर्यंत शहरातील १० हजारावर लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. विकसीत भारत संकल्प यात्रेची माहिती देणा-या रथांद्वारे शहरामध्ये शासनाच्या योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. झोनस्तरावर विविध भागांमध्ये शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत असून या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिबिराच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, ई-बस, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून दिला जात आहे. यासोबतच शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांना झालेला फायदा, मिळालेला लाभ ते स्वत: ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ च्या माध्यमातून आपल्या अनुभवातून व्यक्त करीत आहेत. गुरुवारी ७ डिसेंबर रोजी मनपाच्या आशीनगर झोन अंतर्गत कमाल चौक बाजार क्षेत्र आणि आशीनगर झोन कार्यालय परिसरामध्ये ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ शिबिर घेण्यात आले.या वेळी माजी नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त वैघकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, झोनल वैघकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, झोनल स्वच्छता अधिकारी रोशन जांभुळकर उपस्थित होते. नागरीकांनी या प्रसंगी विकसित भारताची प्रतिज्ञा घेतली.
तळागाळातील, शेवटच्या व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देउन त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे जीवन सुलभ बनविणा-या शासनाच्या महत्वाकांक्षी ‘विकसीत भारत संकल्प’ यात्रेमध्ये नागरिकांनी सहभागी होउन लाभान्वीत व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्तांद्वारे करण्यात येत आहे.