– ‘बंजारा विरासत’ नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण
– पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती
यवतमाळ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ या नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करण्यासाठी येणार होते. मात्र पोहरादेवी येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिर व संत सेवालाल महाराज समाधीस्थळाचे भाविकांमध्ये विशेष महत्व असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे नवरात्रोत्सवात येण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यामुळे २६ सप्टेंबरचा त्यांचा येथील दौरा पुढे ढकलण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवी येथे येणार आहेत, अशी माहिती यवतमाळ-वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधान यांच्या पोहरादेवी दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा म्युझियम येथील कामांचा आढावा घेतला. यावेळी वाशिम जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती विभाग पोलीस आयुक्त, वाशिम पोलीस अधीक्षक आदी अधिकारी उपस्थित होते. पोहरादेवी येथे प्रसिद्ध जगदंबा माता मंदिर असल्याचे कळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रोत्सवात हा कार्यक्रम घेण्याची सूचना केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी बंजारा समाजातील संत, महंतांची चर्चा झाल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरला, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
५ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मान्यवर पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. त्यानंतर येथील जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज, धर्मगुरू रामरामबापू महाराज यांच्या समधीचे दर्शन घेवून ‘बंजारा विरासत’ या नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण करतील. त्यानंतर ते येथे आयोजित सभेस संबोधित करतील, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.
‘बंजारा विरासत’ नंगारा वास्तुसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यात आले आहे. या ठिकाणी बंजारा समाज संस्कृती व परंपरांचे दर्शन होणार आहे. येथे दररोज सायंकाळी लेझर, लाईट व म्युझिक शो होणार आहे. नंगारा प्रतिकृतीवर भव्य स्क्रीन लावण्यात आला असून यावर बंजारा संस्कृतीचे दर्शन येथे येणारा प्रत्येक भाविक, पर्यटक घेवू शकेल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी विकास आराखडा व नंगारा म्युझियमसाठी तब्बल ७२५ कोटी रूपयांचा निधी तत्काळ मंजूर केल्याने हा प्रकल्प वेळेत पूर्ण होवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या आंतराष्ट्रीय वास्तुसंग्रहालायचे लोकार्पण होत असल्याने संपूर्ण बंजारा समाज हर्षोल्हासित झाला आहे, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले. या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील बंजारा बांधवांनी ५ ऑक्टोबरला पोहरादेवी येथे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.