प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेची सुरूवात

– महाराष्ट्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण

शिर्डी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवार, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शिर्डी (जि. अहमदनगर) येथे भेट देणार आहेत. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करतील. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. त्यानंतर काकडी विमानतळालगतच्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधतील. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण करून ते राष्ट्राला समर्पित करतील.

शिर्डीत येणाऱ्या देश- विदेशातील भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे. म्हणून साई संस्थानने १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शन रांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शन रांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. दर्शनरांग प्रकल्पाचे बांधकाम क्षेत्रफळ २ लाख ६१ हजार ९२० चौरस फूट आहे. घडीव दगडाची वातानुकुलीत दर्शन रांग, प्रवेशासाठी ३ प्रवेशद्वार, एकाचवेळी सुमारे ४५ हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाईल ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था, ४८ बायोमेट्रिक पास काऊंटर, २० लाडू प्रसाद काऊंटर, २ साईंची विभूती काऊंटर, २ साईंचे कापड कोठी काऊंटर, २ बुक स्टॉल्स, १० देणगी कांऊटर, ०६ चहा, कॉफी काउंटर व बॅग स्कॅनर, २५ सुरक्षा तपासणी केंद्र, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर भाविकांसाठी १० हजार क्षमतेचे १२ वातानुकूलीत सभागृह, आरओ प्रक्रियेचे शुद्ध पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र, अशी या दर्शन रांगेची वैशिष्ट्ये आहेत.

निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् – सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाइप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील १८२ गावांमधील ६८,८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील ६ गावांमधील २६१२ हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील ६६,२६६ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

काकडी येथील शेतकरी मेळाव्यात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ची सुरूवात प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनेते महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम देऊन त्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन वितरण केले जाणार आहे.

अहमदनगर येथील आयुष हॉस्पिटलचे उद्घाटन, महिला व बाल रुग्णालयाचे भूमीपूजन, शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कुर्डूवाडी – लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (१८६ किमी), जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किमी); एनएच-१६६ (पॅकेज-१) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधांचे लोकार्पण ही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे लाभार्थ्याना वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्य मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीड जिल्ह्यात विमा कंपनीचे अग्रीम न देण्याचे अपील राज्य शासनाच्या समितीने फेटाळले, 25 टक्के अग्रीम त्वरित वितरित करण्याचे आदेश - कृषीमंत्री धनंजय मुंडे

Thu Oct 26 , 2023
मुंबई :- बीड जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळांमध्ये अग्रीम न देण्याचे पीक विमा कंपनीचे अपील आज राज्य शासनाच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळून लावले आहे. बीड जिल्ह्यात सुरुवातीला व मध्य खरिपात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनसह विविध खरीप पिके संकटात आली होती. शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com