संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी येथे २० सप्टेंबर रोजी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. या केंद्राअंतर्गत जीवन विज्ञान आणि फार्मास्युटिकल विज्ञानातील विशेष प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान करणे तसेच फार्मास्युटिकल आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील शिकणाऱ्यांची रोजगार क्षमता वाढविणे हा प्रमुख उद्देश आहे.
या समारंभात कॉलेज व्यवस्थापन समितीसह कामठी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (APTI) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद उमेकर उपस्थित राहतील. या अविस्मरणीय कार्यक्रमाला सर्व संबंधित विभागाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. हा आँनलाईन कार्यक्रम स्व यादवरावजी भोयर स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे.
डॉ. मनीष आगलावे यांना या केंद्राचे एकल संपर्क बिंदू (SPOC) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर डॉ. मयूर काले अतिरिक्त संपर्क म्हणून कार्य करतील. उल्लेखनीय म्हणजे, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज मध्य भारतातील एक प्रमुख फार्मसी संस्था म्हणून मान्यता प्राप्त आहे, ज्याला एनबीए आणि नॅक ए+ मान्यता मिळालेली असून मागील आठ वर्षांत एनआयआरएफ रँकिंगमध्ये सतत उच्च स्थानावर आहे.
खाजगी आणि औद्योगिक क्षेत्रातून अनुभवी प्राध्यापक आणि विशेषतः ग्रामीण भागातील कुशल कर्मचाऱ्यांचा समूह तयार करण्यासाठी या कौशल्य विकास केंद्राचे योगदान होईल असे प्राचार्य डॉ मिलिंद उमेकर यांनी प्रतिपादन केले.