राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

– महाराष्ट्राची अभिनव संकल्पना, मुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा

– देशाने दखल घ्यावी अशी योजना

मुंबई :- प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या रोजगार संधी आणि त्यांना स्वावलंबी करण्याला प्राधान्य दिले आहे. अशा या महाराष्ट्राच्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही बाब देखील गौरवाची आहे. त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केद्रांचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत दृकश्राव्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून (ऑनलाइन) बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगापोल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या महासंचालक जयश्री भोज आदी उपस्थित होते. कौशल्य विकास आय़ुक्त डॉ. ए. रामास्वामी यांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या या संकल्पनेबाबत आणि उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची माहिती सादर केली.

हा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीं यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी संबंधित असल्याने त्याच तोला-मोलाच व्हावा असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तरुणांच्या रोजगार संधी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारे हे महत्वाचे पाऊल आहे. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी वेळ देऊन या योजनेला पाठबळ दिले आहे. त्यामुळे या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर दखल घेतला जाईल असा आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी सज्ज व्हावे. कौशल्य विकास, उद्योग यांच्याबरोबरच महसूल, ग्रामविकास यांच्यासह आपल्या महिला व बालविकास विभागांनीही यामध्ये सहभाग द्यायचा आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांनाही यात सहभागी होता येईल, असे नियोजन करावे. ही एक सुरवात असून पुढे जाऊन या केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ज्या- ज्या गावात हे केंद्र सुरु होणार आहे. त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटक यात कसे सहभागी होतील, यासाठीचे नियोजन करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समन्वय समिती नियुक्त करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सर्वच अधिकाऱ्यांनी देखील आपआपल्या परिसरातील या केंद्रावर उपस्थित राहून या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी मैदान असेल, तर मंडपाची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, वीज पुरवठा सुरळीत राहावी यासाठीची व्यवस्था याबाबतही सूचना दिल्या.

ग्रामपंचायत सदस्यांपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांच्यासह आशा व अंगणवाडी सेविका आदींनाही या कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनात सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. विश्वकर्मा योजनेशी संबंधित लाभार्थी आणि अशा बलुतेदार घटकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे.

मंत्री लोढा म्हणाले की, राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकासाची व्यवस्था नाही. हे लक्षात घेऊन आपण ही संकल्पना राबवत आहोत. हा विषय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या प्राधान्य क्रमावरील विषय आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. त्या दृष्टीने हा कौशल्य केंद्राची ही संकल्पना महत्वाची आहे. भविष्यात राज्यातील या केंद्राची संख्याही वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्य सचिव सौनिक यांनीही महत्वपूर्ण सूचना केल्या. या कार्यक्रमांचे संनियंत्रण प्रधानमंत्री कार्यालयाकडूनही होणार आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्यभरात साडे सात लाखांहून अधिक नागरिक उपस्थित राहतील, असे नियोजन करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

Tue Oct 17 , 2023
नवी दिल्ली : गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून 18 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने दिली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन तसेच क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा सोहळा असणार आहे. ‘इफ्फी-54’ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट निर्माते, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com