नागपूर :- अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील वेगवेगळ्या प्रांतातील 554 रेल्वेस्थानकांवरील विकासकामांची कोनशिला 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता आभासी पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवली जाणार आहे. यात प्रामुख्याने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील 15 रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याची माहिती विभागीय महाव्यवस्थापक मनिष अग्रवाल यांनी पत्रपरिषदेत दिली.
135.44 कोटींचा खर्च
देशभरातील 1500 आरओबी (रोड ओव्हर ब्रीज) आणि अंडर ब्रीजचे उद्घाटन व तर काहींचे लोकार्पणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मध्य रेल्वेच्या 36 आरओबी आणि आरयूबीचा यात समावेश असून यासाठी 135.44 कोटींचाखर्च येणार आहे .
देशाची लोकवाहिनी म्हणून ओळख असलेल्या रेल्वेचे नेटवर्क अधिक प्रशस्त करून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याच्या हेतूने रेल्वे मंत्रालयाने एक व्यापक आराखडा तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर, अमृत भारत स्टेशन ही योजना ऑगस्ट 2023 पासून आकाराला आली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रांतातील रेल्वेस्थानकांचा कायापालट केल्या जात आहे.
नागपूर रेल्वेस्थानक आणि अजनी स्थानकाचे विकास कामे वेगाने पूर्ण करण्यात येत असून डिसेंबर 2025 पर्यंत मुख्य रेल्वेस्थानकाचे तर मे 2026 पर्यंत अजनी स्थानकाचे काम पूर्ण केल्या जाणार आहे. याशिवाय तिसरी व चौथी लाइन्सचे काम सुध्दा वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. मध्य रेल्वेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानित केल्या जाणार असल्याची माहिती मनिष अग्रवाल यांनी दिली.