– विभागीय आयुक्तांकडून संबंधित विभागांचा आढावा
नागपूर :- नागपूर येथे होणाऱ्या सात डिसेंबर पासूनच्या हिवाळी अधिवेशनासाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. आज विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्याच्या आदेश दिले.
आजच्या बैठकीला महानगर पालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपअभियंता संजय उपाध्ये यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने विधिमंडळातील सुरक्षा व्यवस्था व पोलीस बंदोबस्त,सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध करण्यात येणारी राहण्याची व्यवस्था,आमदारांच्या निवासस्थानांची डागडुजी, रवी भवन, आमदार निवास, सुयोग निवास, हैदराबाद हाऊस, सचिवालय या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था, महानगरपालिकेमार्फत होणारा पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य विभागाची तैनाती, मंत्री, महिला आमदारांसाठीच्या विशेष सुरक्षा रचना, तसेच सोयी सुविधा, अग्निशमन दलाची उपलब्धता, याबाबतचा आढावा घेण्यात आला.
सर्व विभागाने आपापल्या जबाबदारीने कामे करण्याचे यावेळी त्यांनी निर्देशित केले गेले. जी-२० सारख्या मोठ्या आयोजनानंतर हे आयोजन होत असल्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची रंगरंगोटी व सजावट करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी महानगरपालिकेला दिले.