– 48 बालकांवर होणार मोफत शस्त्रक्रिया
गडचिरोली :- जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामध्ये ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक/विध्यार्थी यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, उपचार करिता “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून “डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून सदर डीईआयसी मध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार, व इतर आढळलेल्या बालकांच्या आरोग्य तपासण्या व उपचार केले जातात.
बालकांच्या शस्त्रक्रियेच्या निदान व नियोजनकरिता जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अति.जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ सतीशकुमार साळुंखे, डॉ. बागराज धुर्वे, सामान्य रुग्णालय गडचिरोली, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत आखाडे जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या मार्गदर्शनाखाली डीस्ट्रीक अर्ली इंटरवेन्शन सेंटर, बाल आरोग्य विभाग गडचिरोली तर्फे बालकांमधील जन्मता असणारे दोष बाबत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिर व बालकांमधील शस्त्रक्रिया या विषयावर सीएमई-प्रशिक्षणाचे आयोजन दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी डीईआयसी, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात आले.
जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक, अति जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. बालरोग तज्ञ डॉ. तारकेश्वर उईके व डॉ. प्रशांत पेंदाम, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बाल तपासणी शिबीर व प्रशिक्षण पार पडले. संदर्भित विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी सीएमई-प्रशिक्षणाकरिता नागपूर येथील प्रसिद्ध डॉ.राउत वरिष्ठ बालरोग शल्य चिकित्सक तज्ञ व चमू लता मंगेशकर रुग्णालय नागपूर येथील तज्ञ उपस्थित झाले.
शिबिरामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील शालेय तपासणी दरम्यान आढळून आलेले तसेच इतर ठिकाणाहून संशयित संपूर्ण संदर्भित बालके/विध्यार्थी यांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी उपस्थित विषेशज्ञ यांच्याकडून निदान निश्चिती करण्यात आली. यामध्ये एकूण ४८ विद्यार्थी/बालके यांनी लाभ घेतला. यामध्ये हर्निया, हायपोस्पाडीस, हायड्रोनेफ्रोसीस, अनडीशेंडेड टेस्टीस, फायमोसीस, व इतर पात्र बालकांची शस्त्रक्रियेसाठी तृतीय स्तरावर संदर्भ सेवे करिता नियोजन करण्यात येणार आहे. सदर सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. राज्य सामंजस्य करार असलेल्या रुग्णालयाशी समन्वय साधून वेळोवेळी उच्च स्तरीय शल्यचिकित्सक विशेषज्ञ सल्ला सेवा, गरजेनुसार उच्च स्तरीय विशेष चाचण्या व इतर प्रक्रिया चे सनियंत्रण करून डीईआयसी मार्फत शस्त्रक्रियेकरिता तृतीय स्तरावर संदर्भित करण्यात येणार आहे.
यापूर्वी जन्मजात आजाराच्या निदान निश्चिती करिता तपासणीसाठी गडचिरोलीच्या रुग्णाला नागपूर, मुंबई, पुणे येथे जावे लागत असे. परंतु बरेचसे पालक मोठ्या शहरापावेतो जाण्यास तयार नसतात. त्यामुळे बऱ्याच बालकांना निदान व उपचारासाठी मुकावे लागत होते. बालकांमध्ये जन्मता असणारा आजार आहे किंवा नाही हे ओळखून पालकांना लक्षात यायला खुप उशिर लागतो. जितके लवकर निदान तितका लवकर उपचार, परंतु डीईआईसीमुळे या निदान निश्चितीसाठी आता जिल्हातील रुग्णाला व त्याच्या पालकांना परजिल्ह्यात जावे लागणार नाही. लहान मुलांमधील जन्मता असणारे व इतर आजारासाठी डीईआयसी एक पर्वणीच ठरली आहे.