– अयोध्या येथील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा
– सपना व ना. सुधीर मुनगंटीवार भूषविणार यजमानपद
चंद्रपूर :- श्री कन्यका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या सोमवारी (दि. १९ ऑगस्ट) आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यजमानपद भूषविणार आहेत. तर अयोध्या येथील श्रीराम मंदिर समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल.
श्री सिध्देश्वर मंदिर, श्री गणेश, माता पार्वती, हनुमानजी, नागदेवता यासर्व देवांच्या मुर्तीचे नवनिर्माण कार्य पुर्णत्वास आले आहे. या मंदिरात श्री सिध्देश्वर महादेव, श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. १९ ऑगस्टला दुपारी २ वाजता विधीवत प्राणप्रतिष्ठा होईल. त्यानंतर सायंकाळी ६ पासून महाप्रसादाचे वितरण होईल.
प्राणप्रतिष्ठा उत्सवाला (गुरुवार, दि. १५ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजता पुजा व अभिषेक होणार आहे. सपना व सुधीर मुनगंटीवार तसेच श्रध्दा व श्रीपाद मुनगंटीवार यांच्या हस्ते हा अभिषेक होईल. शुक्रवार, दि. १६ ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत वास्तुस्थापन मंडळ देवतास्थापन अग्नीस्थापन ग्रहस्थापन रुद्रस्थापन ग्रह्मशमंदिर वास्तु शांती मुर्तीचा जलाधिवास होणार आहे.
शनिवार, दि. १७ ऑगस्टला सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत स्थापित देवता पुजन रुद्र स्वाहाकार हनुमत् याग मूर्तीमूर्ती हवन शांतिक पौष्टिक वेदादि होम धान्यादिवास होणार आहे. तर रविवार, दि. १८ ऑगस्टला देखील पुजा व अभिषेक होईल. त्यानंतर १९ ऑगस्टला दुपारी २ वाजून ३ मिनीट ते २ वाजून ११ मिनीटे या शुभमुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या संपूर्ण उत्सवात श्रध्दा व श्रीपाद मुनगंटीवार, जया व चंद्रशेखर मुनगंटीवार, शिल्पा व संदिप मुनगंटीवार, सुचिता व सचिन चकनलवार तसेच डॉ. शलाका व डॉ. तन्मय बिडवई यांचा सहभाग असणार आहे.