६६० मेगावाट संच ८ व ९ ची १०० टक्के उपलब्धता व वीज नियामक आयोगाच्या निर्धारित लक्ष्याकडे वाटचाल
कोराडी :- कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली २१० मेगावाट क्षमतेच्या संच क्रमांक ६ चे १०० टक्क्यांपेक्षा जास्त भारांकासह वीज उत्पादन झाले असून नोव्हेंबर महिन्यात तीन वेळा हे लक्ष्य गाठण्यात यश आले. ७ नोव्हेंबरला १००.०३ टक्के, १६ नोव्हेंबरला १००.४९ टक्के तर २२ नोव्हेम्बरला १०१.३८ टक्के इतका भारांक गाठण्यात आला. या संचांचा मागील महिनाभरात सुमारे ७४.४४ टक्के इतका भारांक होता.
मार्च १९८२ साली २१० मेगावाट क्षमतेच्या कोराडी संच क्रमांक ६ कार्यान्वित करण्यात आला होता. सुमारे तीन दशके या संचातून वीज उत्पादन घेतल्यानंतर सन २०१९ मध्ये नूतनीकरण व आधुनिकीकरण करून पुनश्च या संचातून वीज उत्पादन सुरू करण्यात आले. सुमारे १६००० तासांच्या सलग वीज उत्पादनानंतर नुकतेच या संचाची किरकोळ देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आणि आता ह्या संचाने १०० टक्के पेक्षा जास्त भारांक गाठला आहे.
राज्यात विजेची मागणी २४००० मेगावाटच्या घरात असताना २१० मेगावाट संचासोबतच कोराडी ६६० मेगावाट ८ व ९ क्रमांक संचांची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. नोव्हेंबर महिन्यात संच क्रमांक ८ व ९ हे १०० टक्के उपलब्धतेसह भारांक ८१ टक्के असून, वीज नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या ८५ टक्क्याकडे वाटचाल प्रगतीपथावर आहे. मनुष्यबळ, कोळसा आणि योग्य समन्वय राखल्याने महत्तम भार (पीक लोड ) कालावधीत एका तासातले या वर्षातील सर्वोच्च वीज उत्पादन ६२५ ते ६३० मेगावाट इतके आहे हे विशेष.
महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक(संचलन) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक(संवसु-२) पंकज सपाटे यांनी अभय हरणे व कोराडी वीज केंद्राच्या सर्व अधिकारी, अभियंते, तंत्रज्ञ, कामगार, संघटना प्रतिनिधी यांचे अभिनंदन केले आहे.
@ फाईल फोटो