मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, प्रशासनात पारदर्शकता, सुशोभिकरण यांचा अंतर्भाव करावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे मुंबईत एअर प्युरिफायर टॉवर बसवावेत

मुंबई : मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अंतर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल यांना दिले आहेत.

मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतानाच त्यांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी विविध मुद्यांचा आणि उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुडगाव, लखनऊ प्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसविण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करावी

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात विशेष उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सुचविल्या आहेत. मुंबईतील अनेक नागरीक मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विकारांनी ग्रस्त आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करावी, त्यांचा डाटा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण कमी करण्याकरिता बाह्ययंत्रणांची मदत घेतानाच रुग्ण नोंदणी खिडक्यांची संख्या वाढवावी. तसेच एमआरआय, सीटीस्कॅन आणि निदान केंद्र वाढविण्याच्या तसेच डायलिसीस केंद्र उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

महापालिका शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करावेत

महापालिकेच्या प्रत्येक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करावेत, मुंबई पब्लिक स्कूलची मागणी पाहता त्यांची संख्या वाढवावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले आहेत.

मुंबईकरांना सुशासनाचा अनुभव यावा

मुंबई महापालिका प्रशासनाने नागरिकांना सुशासनाचा अनुभव यावा यासाठी प्रयत्न करावेत. महापालिकेकडून लागणाऱ्या इमारत परवाना, मालमत्ता कर, दुकान नोंदणी परवान्याचे नूतनीकरण या आवश्यक परवानग्या आणि परवाने ऑनलाईन देत आहेत त्याच बरोबर नागरिकांना सर्व सुविधा सुलभ आणि सहज मिळतील अशा पद्धतीने प्रशासनाकडून सुशासन असावे, यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई महानगराच्या सुशोभीकरणासोबतच दळणवळण, पायाभूत सुविधा, गर्दी आणि वाहतुकीचे नियंत्रण याबाबतीत सामान्य मुंबईकरांना दिलासा देतानाच महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून अर्थसंकल्पात तरतूद करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमरावती पदवीधर निवडणूक मत मोजणी : अमरावती मतदारसंघात विजयाचा कोटा '47 हजार 101' इतका निश्चित करण्यात आला आहे

Fri Feb 3 , 2023
अमरावती :अमरावती मतदारसंघात विजयाचा कोटा ’47 हजार 101′ इतका निश्चित करण्यात आला आहे. काँग्रेस चे धीरज लिंगाडे यांना हा कोटा पूर्ण करण्यासाठी 3 हजार 584 मतं अद्याप कमी आहेत, तर डॉ. पाटील यांना 5 हजार 930 मतांची गरज आहे. सध्या दुसऱ्या पसंती क्रमाच्या मतांची मोजणी सुरु आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये १२ उमेदवार बाद झाले आहेत. पण अद्याप कोणालाही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com