मुंबई :- शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी “पी. एम कुसुम घटक ब” व “मागेल त्याला सौर कृषीपंप” ही पर्यावरण पुरक योजना सुरु केली असून या योजनेला गती देण्यात येत आहे. यामध्ये १०,०५,००० सौर कृषीपंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पुरवठादार यादीतील कोणत्याही पुरवठादारांची त्यांच्या पसंतीनुसार निवड करता येते. या यादीशिवाय पुरवठादार निवडण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधीसूचना मांडली होती.
राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर म्हणाल्या की, धाराशिव जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३५ हजार ४९१ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरणा केला असून, त्यापैकी २१ हजार ९६५ लाभार्थ्यांनी पुरवठादारांची निवड केली आहे. त्यापैकी १५,२४२ सौर कृषीपंप आस्थापित करण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यात एकूण ४५ पुरवठादार आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना सौर कृषीपंप आस्थापित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
कृषीपंप ग्राहक हा सूचीबद्ध पुरवठादार यादीतील कोणत्याही पुरवठादारांची त्यांच्या पसंतीनुसार निवड करू शकतात. तसेच तांत्रिक तपासणी करूनच सौर कृषीपंप बसवले जात आहेत. सौर पॅनेल, कंट्रोलर व सौर पंपासाठी पाच वर्षांचा हमी कालावधी आहे.
कंत्राटदाराने पंप बसविण्यात विलंब केला तर त्यांच्यावर दंड आकारण्यात येतो. धाराशीव जिल्ह्यामध्ये सौरपंप विलंब केल्याने संबंधित पुरवठादारांला रु.०४.५२ कोटीचा दंड आकारण्यात आला आहे, असेही राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी सांगितले.