– जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन
– खेळाडूंच्या सुविधेसाठी सहा क्षेत्रीय कार्यालये
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव नागपूर शहरातील खेळाडूंसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या पाचव्या पर्वाला येत्या जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. नागपूर शहरातील खेळाडूंचा आपल्या हक्काचा महोत्सव असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी खेळाडूंना सुलभता प्रदान व्हावी या उद्देशाने शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रांमध्ये सहा क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयातून तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्याते नागपूर शहरात खासदार क्रीडा महोत्सवाचा थरार नागपूरकरांना अनुभवता येणार आहे. शहरातील सुमारे ४० मैदानांवर एकाच वेळी हजारो खेळाडू महोत्सवात सहभागी होतात. या खेळाडूंच्या त्यांच्या क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविण्याची महत्वाची संधी खासदार क्रीडा महोत्सवाद्वारे दिली जात आहे. शहरातील सर्व भागातील खेळाडूंना व्यासपीठावर आणण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे महत्वपूर्ण पुढाकार घेउन विधानसभा क्षेत्रनिहाय महोत्सवाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये विवेकानंद नगर येथील इनडोअर स्टेडियम, उत्तर नागपूरमध्ये जरीपटका येथील जिंजर मॉल, पश्चिम नागपूरमध्ये फुटाळा फाउंटेन, पूर्व नागपूरमध्ये सतरंजीपुरा येथील गिरनार बँकेचे कार्यालय, दक्षिण नागपूर येथे रेशीमबाग येथील माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या बाजूला आणि मध्य नागपूरमध्ये महाल येथील चिटणीस पार्क येथे खासदार क्रीडा महोत्सवाचे क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे यंदाचे हे ५ वे वर्ष आहे. खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशानेच या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ‘चक दे नागपूर’ म्हणत खेळांच्या प्रवेशिकांसाठी समितीद्वारे सहा क्षेत्रांच्या कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. ज्या संघाना खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रीय कार्यालयात जाऊन लवकरात लवकर आपल्या संघाचे नाव नोंदवावे, असेही आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांचे नाव व पत्ता
१) दक्षिण पश्चिम नागपूर
कार्यालय :- इनडोअर स्टेडियम
विवेकानंद नगर नागपूर
२) उत्तर नागपूर
कार्यालय:- जिंजर मॉल
जरीपटका, नागपूर
३) पश्चिम नागपूर
कार्यालय:- फुटाळा फॉंनटेन फुटाळा नागपूर
४) पूर्व नागपूर
कार्यालय :- गिरनार बँकेचे कार्यालय सतरंजीपुरा, नागपूर
५) दक्षिण नागपूर
कार्यालय:- माध्यम लोकसेवा प्रतिष्ठानच्या बाजूला रेशीमबाग, नागपूर.
६) मध्य नागपूर
कार्यालय – चिटणीस पार्क, महाल नागपूर