– अमृत वाटिका येथे 75 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत माझी माती, माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश अभियानातील ‘वसुधा वंदन’ उपक्रम रविवारी (ता. १३) रोजी राबविण्यात आला. चिंचभवन वर्धा रोड स्थित वायुसेना ऑफिसर्स मेस परिसरात केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरात अमृत वाटिका तयार करण्यात आली असून येथे 75 देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, एअरफोर्स ऑफिसर्स मेसचे स्टेशन कमांडर ग्रूप कॅप्टन एस. चंद्रा, ग्रूप कॅप्टन मनिषा कृष्णार्थी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल,अतिरिक्त आयुक्त निर्भय जैन, उपायुक्त सुरेश बगळे, रविंद्र भेलावे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रमूख महेश धामेचा, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी वायुसेनेचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात ‘वीरों का वंदन’ उपक्रमांतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एअरफोर्स ऑफिसर्स मेसचे स्टेशन कमांडर ग्रूप कॅप्टन एस. चंद्रा आणि ग्रूप कॅप्टन मनिषा कृष्णार्थी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी देखील परिसरात वृक्षारोपण केले.
मातृभूमीविषयीचे प्रत्येक भारतीयाचे प्रेम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांविषयीचा अभिमान व्यक्त करणारे विविध उपक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियानामध्ये नागपूर महानगरपालिकाद्वारा राबविण्यात येत आहे. या अभियानातील ‘वसुधा वंदन’ हा उपक्रम नागपूर महानगरपालिकेच्या विविध उद्यानात राबविण्यात आला. गांधीबाग उद्यान येथे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते वसुधा वंदन करण्यात आले. तसेच पूर्व नागपूरातील लता मंगेशकर उद्यान येथे आमदार कृष्णा खोपडे यांनी वृक्षारोपण करीत वसुधा वंदन केले.
‘वसुधा वंदन’ अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी अर्थात 75 व्या वर्षाचे औचित्य साधून 75 देशी वृक्षारोपांची लागवड शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली. यात अर्जुन, जांभूळ, कडूनिंब, चिंच, आवळा, सिताफळ, पेरू,जायफळ, दालचिनी अशा विशिष्ट देशी वृक्षरोपांची मान्यवरांच्या शुभहस्ते लागवड करण्यात आली.
शहरात विविध उद्यानात राबविण्यात आलेल्या उपक्रमात माजी महापौर दयाशंकर तिवारी,माजी महापौर माया इवनाते, माजी नगरसेविका पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, माजी नगरसेवक लहुकुमार बेहते, माजी नगरसेविका दर्शनी धवड, माजी नगरसेवक विक्रम ग्वालबंशी, माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे, माजी नगरसेविका जयश्री रारोकर, सरिता कावरे, ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी यांच्यासह माजी नगरसेवक व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.