नवी दिल्ली :-भारतात संधींचा मोठा ठेवा असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. त्यांनी काल, फ्रान्समधील पॅरिस येथे भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. “भारत वस्तू आणि सेवांचा सर्वात मोठे ग्राहक आहे. वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत 50% पेक्षा जास्त वाढ होत आहे आणि यापुढे ही वाढ अशीच सुरू राहिल अशी आशा करतो. याबरोबरच 2030 पर्यंत भारताची वस्तू आणि सेवांची निर्यात $765 अब्ज वरून तिपटीने वाढून $2 ट्रिलियनपर्यंत होईल अशी आम्हाला आशा आहे.” असेही ते म्हणाले.
फ्रान्समधील पॅरिस येथील भारतीय दूतावास, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII), एम ई डी ई एफ (Mouvement des entreprises de France ) आणि इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (IFCCI) यांनी संयुक्तरीत्या भारत-फ्रान्स व्यापार शिखर परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीचे आयोजन केले होते.
दोन्ही देश द्विपक्षीय आणि बहुपक्षीय बैठकांना प्रोत्साहन देतील असा विश्वास फ्रान्सचे विदेश व्यापार, आर्थिक आकर्षण आणि परदेशातील फ्रेंच नागरिक मंडळाचे प्रतिनिधी मंत्री ऑलिव्हियर बेख्त यांनी व्यक्त केला.
सीआयआय च्या मोठ्या शिष्टमंडळाच्या फ्रान्समधील उपस्थितीतून, भारत फ्रान्ससोबतच्या संबंधांना अतिशय महत्त्व देत असल्याचे अधोरेखित होते, असे उद्गार सीआयआयचे उपाध्यक्ष आणि आयटीसी लिमिटेडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी काढले.
भारत आणि फ्रान्स नावीन्यपूर्ण, आर्थिक समावेशन, व्यवसायांमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि शासन क्षेत्रात (ESG) तसेच आफ्रिकेसाठी जागतिक प्रतिबद्धता वाढवण्यासारख्या क्षेत्रात सहयोगी सहभागासाठी वचनबद्ध आहेत, असे सीआयआय चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
‘हरित भविष्याची उभारणी’ ; क्रिटिकल आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज: द न्यू स्ट्रॅटेजिक फ्रंटियर; ‘संरक्षण सहकार्य: आत्मनिर्भर भारताद्वारे सामायिक भविष्य सुरक्षित करणे’ तसेच फ्रान्स आणि भारत: ते युरोप आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रादरम्यानचा स्प्रिंगबोर्ड या विषयावर या शिखर परिषदेत चर्चा सत्रे झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोलमेज बैठक
या मुख्य कार्यकारी अधिकारी गोलमेज बैठकीत भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांमधील 50 हून अधिक मुख्य कार्यकारी अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल तसेच परदेश व्यापार, आर्थिक आकर्षण आणि परदेशातील फ्रेंच नागरिक मंडळाचे प्रतिनिधी आणि फ्रान्स सरकारचे मंत्री ऑलिव्हियर बेख्त यांनी संबोधित केले. या गोलमेज बैठकीत कृषी, पर्यटन, संरक्षण, उत्पादन, फार्मास्युटिकल्स, वस्त्रोद्योग, एरोस्पेस यांसारख्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करण्यात आले.