संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– बाजारात भाजीपाल्याचे भाव कडाडले
– सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे महागाईचा फटका
कामठी :- सद्यस्थितीत जीवनावश्यक वस्तू महागल्या असून बाजारात भाजीपाल्यांचे भाव गगनाला टेकले आहेत. टमाटर, हिरवी मिरची,सांबार, अद्रक,पालक ,मेथी लसणाचे भाव प्रति किलो शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसू लागला आहे.तर कामठीत पेट्रोलच्या किमतीपेक्षाही जास्त टमाटर ची किंमत वाढल्याने टमाटर पेक्षा पेट्रोल स्वस्त अशी स्थिती निर्माण झाली आहे.तसेच भाजीपाला महागल्याने गृहिणीना याचा चांगलाच फटका बसला आहे.
बाजारात टमाटर चे भाव 120 रुपये किलो तर पेट्रोल 107 रुपये लिटर आहे.हिरवी मिरची 160 रुपये ,लसूण 200 रुपये, सांबार 180 रूपये,अद्रक 240 रुपये प्रति किलो,तर पालक व मेथी ह्या 30 रुपये कट्टा विकत आहेत.मजुरीचे दर बहुधा 200 ते अडीचशे रुपये असून मजुरीच्या दरापेक्षा अधिक भाजीपाल्याचे दर असल्याने गोरगरिबानी जगावे की मरावे हा प्रश्न आहे तर भाजीपाला वाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.