ग्रंथोत्सवाची चळवळ नियमित राबवणे शासकीय उपक्रम असावा
नागपूर :- एकेक ग्रंथ हा मोठा ऊर्जा स्त्रोत असतो. माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ग्रंथ आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासनाने ग्रंथोत्सव ही चळवळ नियमित राबवावी. वाचक, लेखक, प्रकाशक, वितरक, राज्यातील ग्रंथालयाचे भविष्य लक्षात घेता ग्रंथोत्सव शासकीय उपक्रम करावा, अशी सूचना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वि. स. जोग यांनी आज येथे केली.
3 व 4 डिसेंबर रोजी नागपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनीय भाषणात ते बोलत होते. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. भारती सुदामे, सहाय्यक ग्रंथालय संचालक मिनाक्षी कांबळे, जिल्हा ग्रंथपाल गजानन कुरवाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
नवीन पिढी ग्रंथापासून दूर चालली असून गुगल व व्हॉटस्ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरी ते ग्रंथास पर्याय ठरु शकत नाही. त्यासाठी नवीन पिढीला ग्रंथाचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून शक्य आहे. त्याबरोबरच ग्रंथोत्सवात कवी संमेलन व परिसंवाद आदीच्या मैफिलीमुळे ग्रंथोत्सव म्हणजे लघुसाहित्य संमेलनच असते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
आजही ग्रंथ आपले अस्तित्व टिकवून आहे. राजसत्ता, धर्मसत्ता व अर्थसत्तेपेक्षा ग्रंथसत्तेला अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या काळात ग्रंथाची उपेक्षा होत असली तरी ग्रंथास ग्रंथ हाच पर्याय आहे. ग्रंथोत्सवाच्या आयोजनामुळे ग्रंथाचे महत्व पुन्हा नवीन पिढीस कळेल. यामुळे वाचक ग्रंथाकडे वळेल. जगात ग्रंथामुळे अनेक क्रांती घडून आल्या. त्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या महापुरुषांना ग्रंथाचे विलक्षण वेड, प्रेम व निष्ठा होती. आपणही ग्रंथनिष्ठा बाळगली पाहिजे, असे डॉ. जोग म्हणाले.
महाराष्ट्र घडविण्यात धारकरी व वारकरी यांचा मोलाचा वाटा आहे. संत साहित्यामुळे अध्यात्मावरील अनेक ग्रंथ निर्मिती झाली. ग्रंथाशिवाय व्यक्तीमत्वाचा विकास शक्य नाही. यासाठी ग्रंथ साहित्यास बळकटी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाला शंभर वर्ष होत असून दीक्षांत सभागृहात ग्रंथोत्सवाचे आयोजन हा योगायोग आहे. ग्रंथ म्हणजे मनातून निघालेली भावना असून त्याच्या माध्यमातून इतरांना प्रेरणा देता येते. यासाठी ग्रंथ घरोघरी पोहचले पाहिजे. नवीन पिढी ग्रंथापासून दुरावलेली असून त्यांना जवळ आणण्यासाठी ई-ग्रंथांच्या माध्यमातून ग्रंथ उपलब्ध करुन त्यांना ग्रंथाजवळ आणा, असे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले.
परिस्थितीनुरुप बदलणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य संस्कृतीसोबत ग्रंथाचे वाचन व्हावे. गुगलद्वारे ज्ञान मिळत असले तरी डिजीटल मोडद्वारे ग्रंथाचे ज्ञान नवीन पिढीला उपलब्ध करुन दयावे तरच नवीन पिढी वाचनाकडे वळेल, असे त्यांनी सांगितले.
जून्या पिढीतील व्यक्तींना ग्रंथाबद्दल जे प्रेम होते. त्यामुळे त्यांचे ग्रंथालयाची नाते जुळले होते. मी ग्रंथालयाची फार ऋणी आहे, असे जेष्ठ कादंबरीकार डॉ. भारती सुदामे म्हणाल्या. गुणवत्ता शब्द संपूर्ण विश्वास व्यापून उरला आहे. त्यासाठी ग्रंथाचा आधार घेणे महत्वाचे आहे. ई-ग्रंथाच्या माध्यमातून ग्रंथसाहित्य सर्वत्र उपलब्ध करुन दयावे. ज्या दिवशी मंदिराप्रमाणे रांगा ग्रंथालयात लागतील त्या दिवशी देशाच्या प्रगतीत वाढ होईल,असे त्यांनी सांगितले.
अन्य माध्यमातील वाचन आणि ग्रंथांचे प्रत्यक्ष वाचन यामध्ये फरक आहे ग्रंथ वाचनाने माणूस आतून उमलत जातो. जे वाचन नवीन साहित्यिक तयार करतात, नवे करण्याची उर्मी निर्माण करतात ज्या वाचनातून माणसं उमलतात ते ग्रंथातूनच होऊ शकते. त्यामुळे दर्जेदार वाचन आवश्यक असल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
वाचकांना एकाच ठिकाणी ग्रंथ मिळावा या उद्देशाने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांनी वाचन संस्कृती अंगिकारावी. ई-बुक उपलब्धतेमुळेच ग्रंथ वाचनाचा कल कमी होत असल्याचे मिनाक्षी कांबळे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात गजानन कुरवाडे यांनी 2010च्या ग्रंथोत्सव धोरणानूसार ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत माहिती दिली. ग्रंथोत्सवात पुस्तकांच्या स्टालचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रांरभी महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार अर्चना गार्जलवार यांनी केले. या कार्यक्रमास ग्रंथ प्रकाशक, वाचक, लेखक, साहित्यिक, शिक्षक, शिक्षीका, नागरिक, ग्रंथालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.