सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन
नागपूर : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे आपल्यासमोर वाढलेले ताट आहे. त्यातून मिळणारे विचार, मार्गदर्शन स्वीकारायचे की नाही ते आपल्यालाच ठरवावे लागेल. हवे ते साकारण्यासाठी जिद्द बाळगावी लागेल, तरच यश मिळू शकेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.
ऑरेंज सिटी क्लचरल फाउंडेशन आणि नागपूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित सहाव्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कॅनडाचे कॉन्सलेट जनरल मायकल वॉन्ग, ज्येष्ठ कलावंत व समीक्षण समर नखाते, जयंती चित्रपटाचे दिग्दर्शक शैलेश नलावडे, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विदर्भ साहित्य संघाचे श्री विलास मानेकर आणि आयोजन समितीचे अन्य सदस्य उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते. 

डॉ. राऊत म्हणाले की, दिवसभराच्या कामाचा ताण घालविण्यासाठी संगीत आणि साहित्यच उपयोगी ठरते. मीसुद्धा त्याचाच आधार घेतो. चित्रपट क्षेत्राशी संबंधित अनेकांशी मैत्रीचे संबंध आहेत. सलमान आणि शहारून घरची बिरयाणी खाण्यासाठी माझ्याकडे येत असतात. आंबेडकरी समाजही चित्रपट क्षेत्रापासून लांब नाही. अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. यापुढेही देत राहू. चित्रपट महोत्सव नवोदितांसाठी उपयुक्त असल्याचे ते म्हणाले.

डॉ. जब्बार पटेल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित चित्रपटाच्या नागपुरातील चित्रिकरणादरम्यानच्या आठवणींना उजाळा दिला. पुण्याला दरवर्षी अडीच ते तीन हजार चित्रपट सुमारे १२० देशांमधून येत असतात. वर्षभर त्याचे स्क्रिनींग सुरू असते. त्यातून उत्कृष्ट १४ आंतरराष्ट्रीय चित्रवट व ७ मराठी चित्रपटांची निवड करण्यात येते. या महोत्सवांच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रात जगात काय सुरू आहे. नवे काय, त्याबाबतची माहिती मिळत असते, यामुळे नवोदितांसाठी ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालन डॉ. सुधीर भावे यांनी केले तर आभार डॉ. उदय गुप्ते यांनी मानले. उद्घाटनीय सोहळ्यानंतर ‘अ हिरो’ हा इराणी चित्रपट दाखविण्यात आला.