गडचिरोली :- वृत्तपत्रांसोबतच इलेक्ट्रॉनिक व सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक विषयक जाहिराती व पेड न्यूजवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज दिल्या.
निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कल्याणम यांनी आज जिल्हा माहिती कार्यालयात स्थापन जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण कक्षाला (एम.सी.एम.सी.) भेट देत पाहणी केली. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. खर्च समितीचे नोडल अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे सदस्य विलास कावळे, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सदस्य प्रा. रोहित कांबळे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी रमेश मडावी, लेखाधिकारी संजय मतलानी, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा माध्यम कक्षातील प्रा. प्रितेश जाधव, महादेव बसेना, दिनेश वरखेडे, स्वप्नील महल्ले, विवेक मेटे, प्रज्ञा गायकवाड, वामन खंडाईत, गुरूदास गेडाम आदी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक कल्याणम यांनी राजकीय जाहिरातींचे प्रमाणीकरण, वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींचे संनियंत्रण, पेड न्यूजवर लक्ष ठेवणे, निवडणूक आचारसंहिता कालावधीत माध्यमांमध्ये येणारे वृत्त जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देणे, पेड न्यूजचे अहवाल, माध्यमांना निवडणुकीसंदर्भातील माहिती वेळेत उपलब्ध करुन देणे आदी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीचे कामकाज बाबींची माहिती घेतली.
यावेळी निवडणूक विषयक वृत्तपत्रांतीय कात्रणे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावरील फेक न्यूज व पेड न्यूज बाबत अहवाल, समाज माध्यमांवर पोलिस सायबर सेल च्या सहकार्याने ठेवण्यात येणारे बारीक लक्ष, राज्य समितीशी समन्वय याबाबतची माहिती पथकप्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी निवडणूक निरीक्षकांना दिली.